पश्चिम प्रभागातील विविध ठिकाणाची पाहणी

स्वच्छता, नाले व अतिक्रमणाबाबत आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची

संबंधित अधिकार्‍यांना तातडीने कारवाईचे निर्देश

अमरावती /27 जुलै: शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पश्चिम प्रभागातील नागरी समस्यांची पाहणी केली.
पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा, कुठेही सांडपाणी साचून आजारपण पसरू नये आणि नागरिकांना अतिक्रमणाचा त्रास होऊ नये, यासाठी आयुक्तांनी नागपुरी गेट परिसरासह विविध भागांत थेट जात पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी कचरा व्यवस्थापन, नाल्यांची सफाई, रस्त्यांची स्वच्छता आणि अतिक्रमणाची परिस्थिती यांचा बारकाईने आढावा घेतला. निष्काळजीपणा करणार्‍यांवर कठोर कारवाईचा इशारा देत त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना तात्काळ कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नागपुरी गेट भागातील मुख्य मार्ग, अंतर्गत गल्ल्या आणि मनपा शाळा क्रमांक 3 ची पाहणी करताना त्यांनी तेथील स्वच्छता, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची उत्तम सोय ठेवण्याच्या सूचना दिल्या. ट्रान्सपोर्ट परिसरातील कचरा संकलन केंद्राची पाहणी करून कचर्‍याचे योग्य वर्गीकरण व वेळेवर विल्हेवाट लावण्याचे स्पष्ट केले. लालखडी रिंग रोड व लालखडी पुलाजवळील रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रणे हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच भाजीबाजार व अग्निशमन केंद्राला भेट देऊन आपत्कालीन यंत्रणा सतत सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले. या दौर्‍यात झोन सभापती खा. आसिया अंजुम वहीद, नगरसेवक सय्यद राशीद अली, सै. शौकत अली, सादिक शाह, अहमद भाई, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त मनोज शहाळे, डॉ. फिरोज खान, उपअभियंता विवेक देशमुख, ज्येष्ठ आरोग्य निरीक्षक राजेश राठोड यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छता ही केवळ एक मोहीम नसून ते रोजचे काम असले पाहिजे. नालेसफाई आणि अतिक्रमाणात कसलीही हलगर्जी सहन केली जाणार नाही; कामचुकारपणा करणार्‍यांवर थेट कारवाई होईल.

संबंधित बातम्या

Back to top button