पत्नीसह पोटच्या मुलाची गळा चिरून हत्या

स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज

नाशिकमधील हादरवणारी घटना

नाशिक /20 जुलै : नाशिक शहरातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकरोड परिसरातील जेलरोड भागात एका पतीने स्वतःच्याच पत्नीची आणि पोटच्या मुलाची ब्लेड सदृश चाकूने गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या दुहेरी हत्याकांडानंतर आरोपी पतीने स्वतःही विषारी औषध सेवन करून स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेने संपूर्ण नाशिक शहर हादरले असून परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित पतीने धारदार ब्लेड सदृश शस्त्राने पत्नी आणि मुलाच्या गळ्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, माय-लेकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पतीने  विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपी पतीला तातडीने नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या पतीवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या दुहेरी हत्येमागचे नेमके कारण काय होते? कौटुंबिक वाद होता की आर्थिक विवंचना, हे अद्याप अस्पष्ट आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी अधिक तपास करत आहेत. या प्रकरणात काय माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button