आनंदमठातील महाराजांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

चांदूर रेल्वे परिसरात खळबळ पीडित महिलेचे दहा वर्षे शोषण

अमरावती /19 जुलै- श्रद्धा आणि विेशासाचा गैरफायदा घेऊन एका महिलेचे तब्बल दहा वर्ष शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केल्याप्रकरणी चांदूर रेल्वे येथील आनंदमठाचे महाराज दत्तगिरी गुरु जयरामजी महाराज यांच्यावर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण चांदूर रेल्वे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, अध्यात्माच्या नावाखाली चालणार्‍या या प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची 2014 मध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने दत्तगिरी महाराज यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर महाराजांनी
तिचा विेशास संपादन केला. ऑगस्ट 2016 मध्ये तिला आनंदमठात बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध पहिल्यांदा बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले आणि कोणाला काही सांगितल्यासजीवे मारण्याची धमकी दिली. 1 ऑगस्ट 2016 ते 30 मे 2026 या काळात लग्न करण्याचे आणि आयुष्य सुखी करण्याचे खोटे आमिष दाखवून आरोपीने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या काळात तिचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण करण्यात आले. पीडितेचे लग्न झाल्यानंतरही महाराजांनी तिच्याशी संपर्क सुरूच ठेवला आणि तिला पतीपासून काडीमोड घेण्यासाठी भाग पाडले. काडीमोड घेतल्यानंतर महाराजांनी तिला मठात पत्नीसारखे ठेवले आणि तिच्याकडून मठातील
भक्तांकडून पैसे गोळा करण्याचे काम करून घेतले. हे गोळा केलेले पैसे महाराज स्वतःच्या खर्चासाठी वापरायचे. त्यानंतर पीडित महिलेला मठातून बाहेर काढण्यात आले. 19 जून 2026 रोजी ती पुन्हा मठात गेली असता, तिथे उपस्थित असलेल्या भक्तांसमोर महाराजांनी तिचा अपमान केला. तिला शिवीगाळ आणि मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत मठातून हाकलून लावले.
शेवटी या छळाला कंटाळून पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपी दत्तगिरी गुरु जयरामजी महाराज यांच्याविरुद्ध बीएनएस कलम 64(2), 351(2) आणि पोक्सो  कायद्याच्या कलम 4 व 6 अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button