सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान
ज्येष्ठ नेते सच्चिदानंद सिंह यांच्याकडून कायदेशीर नोटीस

मुंबई /13 जुलै: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर 2023 मध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले
होते. मात्र, 28 जानेवारी रोजी विमान अपघातात अजित पवारांचे निधन झाले, त्यानंतर, राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल
पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याची घोषणा केली. पटेल यांनी पक्षाच्या
राष्ट्रीय कार्यकारिणीत याबाबतचा प्रस्ताव मांडला, त्यास सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली. त्यामुळे, सुनेत्रा पवार यांच्याकडे
उपमुख्यमंत्रीपदासह पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, आता याच निवडीला राष्ट्रवादी
पक्षातूनच आक्षेप घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्ष पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित
करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जेष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पक्षाच्या अध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांना 9 जुलै रोजी त्यांनी ही नोटीस बजावली असून राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक पुन्हा
घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रपुल्ल पटेल आणि पक्षाचे सचिव म्हणून ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात, 26
फेब्रुवारी 26 रोजी घेण्यात आलेली पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक ही अवैध असल्याचे म्हणत ती रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत स्वतंत्र आणि नि:पक्षपाती असा निवडणूक अधिकारी नेमून त्यांच्या मार्फत निवडणूक घेण्यात यावी. तोपर्यत राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुधारीत ाफिस बेअररची यादी देखील रद्द समजावी,
असेही नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे. ज्या व्यक्तीने नोटिस पाठवली त्याने केवळ प्रसिद्धीसाठी हे केलेलं आहे,
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड कायद्याला धरून आहे, असे राष्ट्रवादीचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी म्हटले. राष्ट्रीय कार्यकारिणीत अध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षाला इतर निवडीचा अधिकार असतो, त्यानुसार प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि सुनील तटकरे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड प्रक्रिया पार पडल आहे. राष्ट्रीय अध्यक्ष निवडीवेळी नव्या संविधानाचा दाखल दिलेला आहे, तो चुकीचा आहे लवकरच आम्ही याबाबत बोलणार आहोत, असेही सूरज चव्हाण यांनी स्पष्ट केले.




