उद्या मनपा आयुक्त डॉ. गोंदावले यांचे शहरात आगमन
शनिवार किंवा रविवारी स्वीकारणार पदभार

अमरावती/9 जुलै – स्थानिक महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांचे शनिवारी शहरात अधिकृत आगमन होणार आहे. अमरावतीत दाखल झाल्यानंतर ते उद्या म्हणजेच शनिवारी किंवा परवा रविवारी आपल्या आयुक्तपदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या या संभाव्य पदभार ग्रहणामुळे अमरावती महानगरपालिकेच्या वर्तुळात आणि
प्रशासकीय पातळीवर कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. गुरुवारच्या रात्री ’दैनिक आपली मातृभूमी’शी विशेष
संवाद साधताना नवनियुक्त आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी स्वतः या संदर्भातील महत्त्वाची माहिती दिली. आपण शनिवारी अमरावतीत येत असून, त्यानंतर शनिवारी किंवा रविवारी महानगरपालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार असल्याचे
त्यांनी स्पष्ट केले आहे. डॉ. मंगेश गोंदावले शहरात दाखल होणार असल्याच्या पोर्शभूमीवर महानगरपालिकेत प्रशासकीय
हालचालींना मोठा वेग आला आहे. नवीन आयुक्तांच्या स्वागताची आणि पदभार सोहळ्याची पूर्वतयारी मनपा प्रशासनाकडून पूर्ण केली जात आहे. ते शनिवारीच मुख्य खुर्चीवर बसणार की रविवारी सुट्टीच्या दिवशी पदभार स्वीकारून थेट कामाला सुरुवात करणार, याकडे आता मनपाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. डॉ. गोंदावले हे नेमके कोणत्या दिवशी सूत्रे हाती घेतात, हे आता काही तासांतच स्पष्ट होईल.




