एकनाथ खडसेंची घरवापसी होणार?

विनोद तावडेंनी घेतलेल्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई /9 जुलै: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्याआड मोठ्या हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहेत. आगामी काळात होणार्‍या मोठ्या राजकीय उलथापालथीच्या चर्चांना उधाण आले असतानाच, भाजपच्या गोटातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात एकनाथ खडसे यांच्या भाजपमधील संभाव्य घरवापसीची चर्चा जोरात होती. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी झालेल्या त्यांच्या भेटीचे फोटोही व्हायरल झाले होते. मात्र राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांच्या विरोधामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली होती. आता पुन्हा एकदा तावडेंच्या या भेटीने खडसेंच्या कमबॅकच्या शक्यतांना दुजोरा मिळत आहे.राजकीय विश्लेषकांच्या मते, ही भेट केवळ सदिच्छा नसून दिल्लीतील भाजप नेतृत्वाची एक मोठी खेळी असू शकते. उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसे यांचा असलेला जनाधार आणि ओबीसी चेहरा म्हणून त्यांची ओळख, या गोष्टींचा विचार करता त्यांना
पुन्हा पक्षात आणून भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर, या हालचालींमुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला एक प्रकारे आव्हान निर्माण केले जात असल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. दुसरीकडे, एकनाथ खडसे यांनी ही भेट राजकीय नसल्याचे स्पष्ट
केले आहे.मात्र, त्यांची सून रक्षा खडसे केंद्रात मंत्री असताना आणि कन्या रोहिणी खडसे शरद पवार यांच्या पक्षात सक्रिय असताना, एकनाथ खडसे यांची पुढची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ खडसे पुन्हा भाजपाच्या ‘कमळ’ चिन्हाचा हात धरणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

संबंधित बातम्या

Back to top button