दुचाकी अपघातात मामाचा मृत्यु, भाचा गंभीर
अंजनसिंगी मार्गावरील घटना

-डुक्कर आडवे आल्याचे कारण
धामणगाव रेल्वे / 18 मे : डूक्कर आडवे गेल्याने संतुलन बिघडून दुचाकीला अपघात झाला आणि त्यात मामाचा मृत्यु झाला तर भाचा गंभीररीत्या जखमी झाला. हा अपघात शनिवारी उशिरा रात्री धामणगाव रेल्वे-अंजनसिंगी मार्गावर घडला. विकास तराडे (60, रा. रामनगर वर्धा) असे मृतकाचे नाव असून अपघातात त्यांचा भाचा पंकज सुभाष ठाकरे (35) हा गंभीररीत्या जखमी झाला.
विकास तराडे हे धामणगावच्या अशोकनगर येथे आपल्या बहिणीकडे पाहुणे म्हणून आले होते. शनिवारी सायंकाळी ते आपला भाचा पंकज ठाकरे याच्यासह दुचाकीने काही कामानिमित्त अंजनसिंगी येथे गेले होते. रात्री आठ वाजताच्या सुमारास या भागात वादळी वार्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यातच विकास तराडे आणि पंकज ठाकरे हे मामा-भाचे दुचाकीने अशोकनगरकडे येण्यासाठी निघाले. अशोकनगर परिसरातच असलेल्या दिगंबर राजनकर यांच्या शेतासमोर अचानक त्यांच्या दुचाकीसमोर एक डुक्कर आडवे आले, तेव्हा अचानक दुचाकीचे ब्रेक दाबल्याने संतुलन बिघडले आणि दोघेही दुचाकीसह रस्त्यावर कोसळले.
या अपघातात विकास तराडे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर पंकज ठाकरे हा गंभीररीत्या जखमी झाला. माहिती मिळताच काही गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेउन जखमी पंकजला धामणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तराडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पंकज ठाकरे हा अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.