अमरावती-पुणे रेल्वे प्रवाशांचे हाल वाढणार
चार जुलैला विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

पुणे स्थानकापर्यंत गाड्यांच्या फेर्या मर्यादित
अमरावती /1 जुलै- पुणे स्थानकावरील रेल्वे स्थानकाच्या परिसरातील रुळांच्या आणि सिग्नल यंत्रणेच्या नूतनीकरणाच्या कामाचा मोठा फटका रेल्वे प्रवाशांना बसणार आहे. या तांत्रिक कामामुळे चार जुलै रोजी अमरावती ते पुणे धावणारी गाडी क्रमांक 11406 ही गाडी थेट पुणे स्थानकापर्यंत न जाता हडपसर स्थानकापर्यंतच धावणार आहे.
प्रशासनाने या कामासाठी विशेष वाहतूक आणि वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला असून, याचा थेट परिणाम अनेक लांब पल्ल्याच्या आणि स्थानिक गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत चौकशी यंत्रणेवरून किंवा मोबाईल प्लिकेशनवरून गाड्यांची अचूक माहिती घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुणे स्थानकातील रुळांच्या रचनेतील ’डीआरएस’ क्रमांक 207 आणि 208 हे पॉईंट्स बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे केवळ चार जुलैची अमरावती-पुणे गाडीच नव्हे, तर पाच जुलै रोजी पुणे-तळेगाव डेमू, तळेगाव-पुणे डेमू, पुणे-दौंड डेमू, सातारा-पुणे डेमू, मुंबई सीएसएमटी-पुणे आणि पुणे-मुंबई सीएसएमटी अशा अनेक महत्त्वाच्या स्थानिक गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे स्थानकही बदलण्यात आले असून, जयपूर-पुणे, मुंबई-पुणे, जम्मू तवी-पुणे आणि नागपूर-पुणे या गाड्या खडकी किंवा हडपसरपर्यंतच येणार आहेत. काही स्थानिक गाड्या आता शिवाजीनगर स्थानकातून सुटतील, तर पुणे-जयपूर आणि पुणे-मुंबई सीएसएमटी गाड्या खडकी स्थानकातून रवाना होतील. पुणे-नागपूर गाडी आता हडपसर स्थानकातून सुटेल आणि लोणावळा-पुणे दरम्यानच्या काही गाड्या तीस मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे.
प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना-रेल्वेच्या तांत्रिक कामामुळे चार जुलै रोजी अमरावती-पुणे गाडी हडपसर स्थानकापर्यंतच येणार असल्याने पुणे प्रवासासाठी हडपसरपासून पर्यायी वाहनांचा वापर करावा लागेल. प्रशासनाने या बदलांची दखल घेऊन प्रवाशांनी आपला प्रवास सुकर करावा आणि रेल्वेची अधिकृत माहिती तपासावी. ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रवासाच्या नियोजनात बदल करणे आता प्रवाशांना अनिवार्य झाले आहे.




