नक्षलवाद्यांचा भूमिगत शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त

लेथ मशीन, 150 क्लेमोर पाईप्स जप्त, सुरक्षा दलांना नक्षलविरोधी मोहिमेत मोठे यश

गडचिरोली/28 जून- जिल्ह्यातील नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बालबेडा जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीखाली लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मिती कारखाना गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांच्या संयुक्त कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आला. या कारवाईत 5 ते 6 टन वजनाची लेथ मशीन, 150 क्लेमोर व बीजीएल पाईप्स, 220 बारा बोअर पाईप्स तसेच शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे मोठ्या प्रमाणातील साहित्य जप्त करण्यात आले. दुर्गम भागातून हे साहित्य बाहेर काढणे अशक्य असल्याने ते घटनास्थळीच सुरक्षितपणे नष्ट करण्यात आले.
सुरक्षा दलांवर मोठे हल्ले घडवून आणणे, निवडणुका किंवा नक्षल सप्ताहाच्या काळात घातपात करणे आणि शस्त्रसाठा वाढविणे या उद्देशाने नक्षलवाद्यांनी हा गुप्त कारखाना उभारल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यापूर्वी 23 आणि 27 मे रोजी अशाच कारवायांमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आता या कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या रसद व्यवस्थेला आणखी मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त मोहीम-बालबेडा जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी शस्त्रनिर्मितीचे साहित्य दडवून ठेवल्याची गोपनीय माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली 26 जून रोजी विशेष अभियान पथक (सी-60), प्राणहिता पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) तसेच सीआरपीएफच्या जवानांच्या एकूण सहा तुकड्या शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आल्या. जमिनीखाली दडवलेला शस्त्रसाठा उघड-27 जून रोजी जवानांनी संशयित परिसराला वेढा घालून तपास सुरू केला. बीडीडीएसच्या पथकाने केलेल्या सखोल तपासणीत जमिनीखाली पुरलेला मोठा शस्त्रनिर्मिती साठा उघडकीस आला. यात 5 ते 6 टन वजनाची लेथ मशीन, 150 क्लेमोर व बीजीएल पाईप्स, 220 बारा बोअर पाईप्स, 20 रायफल रॉड मेटल पट्ट्या आणि इतर साहित्य आढळून आले. अत्यंत दुर्गम व डोंगराळ भाग असल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार संपूर्ण साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button