जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात बालकांसाठी स्वतंत्र आयसीयू युनिट उभारा

आ.सुलभा खोडके यांची लक्षवेधी

मुंबई /26 जून- राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेतील कामकाजा दरम्यान आ.सुलभाताई संजय खोडके यांनी अमरावती जिल्हयाच्या आरोग्य सेवांचा विस्तार व अधिक बळकटी मिळण्यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला. गंभीर अवस्थेतील बालकांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन ) येथे नवजात बालकांना अतितात्काळ आरोग्य सेवा पुरविण्यासाठी स्वतंत्र आयसीयु युनिट स्थापन करण्याची मागणी आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी विधानसभेतुन केली आहे.
आ.सुलभा खोडके यांनी सभागृहाला अवगत केले कि, अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय येथे आरोग्याच्या चांगल्या सुविधा निर्माण होत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन ) येथे नूतन इमारतीमध्ये नवजात बालकांसाठी 46 बेडेड एनआयसीयु केअर युनिट सुरु आहे. त्याठिकाणी शहरी भागाबरोबरच ग्रामीण तसेच मेळघाट -धारणी सारख्या आदिवासी दुर्गम भागातून रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. त्यामुळे आजारी किंवा मुदतपूर्व जन्माला आलेल्या नवजात बाळांची काळजी घेण्यासाठी 24 तास आयसीयू ची वैद्यकीय सेवा पुरवितांना अडचणी निर्माण होतात. सद्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती करिता जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात बाळांसाठी स्वतंत्र आयसीयू युनिट निर्माण करणे आवश्यक असल्याचे सुद्धा आमदार महोदयांनी सभागृहात समक्ष सांगितले. यासंदर्भात सभागृहा समक्ष उत्तर देतांना राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार – प्रकाश आबिटकर यांनी सांगितले कि, अमरावती जिल्हयाच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नरत असून नेहमीच चांगल्या आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आदीवासी क्षेत्रात देण्यात येणार्‍या सर्व आरोग्य सुविधांच्या अनुषंगाने विशेष बाब म्हणून नवजात बालकांसाठी सुद्धा अतिदक्षतेच्या सेवा तात्काळ उपलब्ध करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे ना. आबिटकर यांनी सभागृहात सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button