अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टी
अमरावती, दर्यापूर, अंजनगाव सुर्जीमध्ये जोरदार पाऊस, 4 घरांची अंशतः पडझड

अमरावती/25 जून-अमरावती मान्सूनने दमदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या तीन तालुक्यांतील सहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे चार घरांची अंशतः पडझड झाली, तर मोर्शी तालुक्यात वीज पडून तीन बकर्या दगावल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती निवारण विभागाने गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, अमरावती तालुक्यातील अमरावती महसूल मंडळात 91.5 मिमी, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कोकर्डा महसूल मंडळात 77.8 मिमी आणि सातेगाव महसूल मंडळात 65.5 मिमी पावसाची नोंद झाली. तसेच, दर्यापूर तालुक्यातील दर्यापूर महसूल मंडळात 100.5 मिमी, खल्लार महसूल मंडळात 69.5 मिमी आणि थिलोरी महसूल मंडळात 67 मिमी पाऊस पडला.या पावसामुळे धारणी आणि दर्यापूर तालुक्यातील प्रत्येकी दोन घरांची अंशतः पडझड झाली. मोर्शी तालुक्यातील शेत शिवारात वीज कोसळल्याने तीन बकर्यांचा मृत्यू झाला. महसूल विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सुमारे 7 हेक्टर शेतीपिकांचेही नुकसान झाले आहे.जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असली तरी, पावसाचे वितरण असमान राहिले. धामणगाव रेल्वे आणि वरुड तालुक्यात पावसाचा एकही थेंब पडला नाही, तर चांदूर रेल्वे तालुक्यात केवळ 0.1 मिमी नगण्य पाऊस नोंदवला गेला. 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 17.3 मिमी पाऊस पडला. दरम्यान, 24 जून रोजी सायंकाळी अमरावती शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक व्यापारी संकुले, रुग्णालये आणि इतर इमारतींच्या तळघरात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. झाडे पडण्याच्या आणि जलमय परिस्थितीच्या अनेक तक्रारी पालिकेच्या अग्निशमन दलाकडे प्राप्त झाल्या. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत युद्धपातळीवर मदतकार्य राबवले.




