चांदुर रेल्वेत वादळी पाउस, वीज पूरवठा खंडित
विजेचे खांब जमीनदोस्त

-पिंपळाचे झाडही कोसळले
चांदूर रेल्वे / 18 मे : चांदुर रेल्वे शहर आणि तालुक्यात शनिवारी रात्री उशिरा सोसाट्याच्या वादळी वार्यासह विजेचा कडकडाट आणि पावसाने थैमान घातले. त्यात शहरातील वीजेचे अनेक खांब जमीनदोस्त झाल्याने शहरातील वीज पूरवठा खंडित झाला होता. त्याचप्रमाणे चांदुर रेल्वे शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेले पिंपळाचे जूने व मोठे वृक्ष उन्मळून कोसळले. सुदैवाने या घटनेत जिवितहानी झाली नाही, पण नगर परिषद मार्केटमधील दुकानाच्या छताचे नूकसान झाले.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून चांदूर रेल्वे तालुक्यात ढगाळ व पावसाचे वातावरण आहे. शनिवारी रात्री उशिरा शहरासह आजूबाजूच्या परिसरात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुटला आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यात शहरातील विजेचे काही खांब कोसळले. त्यामुळे विजेच्या तारा तुटून अनेक भागातील वजी पूरवठा खंडित झाला होता. परिणामी नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले आणि त्यांची मोठी गैरसोय झाली. दुसरीकडे शहरातील मुख्य बाजारपेठ व स्टेट बँकेच्या वळाणावरील भल्ले मोठे जुनें पिंपळाचे झाड वादहामुळे उन्मळून कोसळले. सुदैवाने यावेळी वर्दळ नसल्याने जिवितहानी झाली नाही.
काही दिवसांपूर्वी येथे नाली सफाईचे कारण समोर करून जेसीबीने पिंपळाच्या झाडाच्या मुळा मोकळ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळेच हे झाड पडले असावे, अशी चर्चा शहरात होत आहे. झाड पडल्याने नगर परिषद मार्केटमधील दुकानदाराचे मोठे नूकसान झाले असून त्यांना भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच नगरपरिषद विभागातील कर्मचारी जितू कर्से, पोलिस कर्मचारी व महावितरणचे कर्मचारी यांच्यासह माजी नगराध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी व नगरसेवक बच्चू वानरे घटनास्थळी पोहोचले. तातडीने रस्ता मोकळा करण्याकरिता वृक्ष कापून हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. काही तासांत रस्ता मोकळा झाला. पण रात्रभर काही परीसरातील वीज पूरवठा खंडित राहीला.