मसानगंज व तपोवन परिसरात प्लास्टिक जप्ती आणि डस्टबिन तपासणी मोहीम
14,500 दंड वसूल

अमरावती /22 जून : अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले झोन क्र.1 यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (22 जून) मसानगंज, तपोवन परिसर आणि लगतच्या व्यापारी भागात प्रतिबंधित प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान एकूण 23 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान काही ठिकाणी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर तसेच डस्टबिन नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करताना आढळून आलेल्या संतराम साहू यांना 5,000 व राजेश पंचमलाल साहू यांना 5,000 असा दंड आकारण्यात आला. तसेच डस्टबिन नसल्याबाबत अंजली किराणा यांना 1,000, जय गजानन धान्य भंडार यांना 1,000, सारिका उज्जैनकर यांना 500, गणराज पान सेंटर यांना 500, संजीवनी गावंडे यांना 500 आणि जितेंद्र पाटील यांना 1,000 दंड आकारण्यात आला. या कारवाईत एकूण 14,500 इतका दंड वसूल करण्यात आला. महानगरपालिकेने नागरिक व व्यावसायिकांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळावा तसेच स्वच्छता नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे.
सदर मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक राजू डीक्याव, स्वास्थ निरीक्षक सचिन सैनी, निखिल खंगाळे, मेघराज ढेनवाल, इमरान खान, रोहित हडाले, परिक्षीत गोरले, आशिष सहारे आणि एम. सैय्यद यांनी सहभाग घेतला.




