प्रविण पोटे पाटील 400 पार

अमरावती विधान परिषद निवडणूक भाजपसाठी एकतर्फी ठरली

महायुतीची अभेद्य रणनीती

उमेदवाराची उज्ज्वल प्रतिमा

मतदारांशी कौटुंबिक संबंध

आमदारकीच्या कार्यकाळात उत्तम कामगिरी

अमरावती /18 जून- अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भाजप आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रविण पोटे पाटील यांनी 400 पेक्षा जास्त नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत आपला विजयाचा मार्ग सुकर केला आहे. मतदानाची आकडेवारी आणि मतदार संघातील वातावरण पाहता पोटे पाटील यांचा विजय आता केवळ औप चारिकता उरला आहे.
भाजपची एकहाती रणनीती-निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवाराच्या नावावरून सुरू असलेली संदिग्धता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण पोटे पाटील यांच्या नावाची घोषणा करून दूर केली होती. भाजपची ही स्पष्ट भूमिका, पक्षाचे नियोजन आणि स्थानिक नेत्यांनी दिलेले भक्कम पाठबळ यामुळे सुरुवातीला पक्षात असलेल्या काही मतभेदांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. पोटे पाटील यांचा नगरसेवकांशी असलेला थेट वैयक्तिक संवाद आणि तळागाळातील कार्यकर्त्यांची फौज यांमुळे ही निवडणूक भाजपसाठी एकतर्फी ठरली आहे.
विक्रमी मतदानाची नोंद-या निवडणुकीत एकूण 94.68 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. विशेष म्हणजे धारणी, अचलपूर, मोर्शी आणि चांदूर रेल्वे येथील मतदान केंद्रांवर 100 टक्के मतदानाची नोंद होऊन एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. महिला मतदारांचा सहभागही लक्षणीय असून 94.25 टक्के महिलांनी मतदान केले. दर्यापूरमध्ये 98.33 टक्के मतदान झाले, तर तिवसा आणि भातकुली क्षेत्रात 68.42 टक्के इतकी नोंद झाली.
काँग्रेसची नामुष्की आणि अंतर्गत संघर्ष-दुसरीकडे, काँग्रेस पक्षात उमेदवार निवडीवरून झालेला गोंधळ आणि त्यातून निर्माण झालेला नेत्यांमधील संघर्ष पक्षाला महागात पडला. काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या या गोंधळाचा फटका मतदानावर स्पष्टपणे दिसून आला. अमरावती महानगरपालिकेत काँग्रेसच्या 11 नगरसेवकांनी मतदान केले नाही. तर तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्यातब्बल 12 नगरसेवकांनी पक्षाचा व्हिप पाळत मतदाना प्रक्रियेत सहभाग घेण्याचे टाळले. एकूणच, काँग्रेसच्या या दुबळ्या रणनीतीमुळे विरोधकांचे आव्हान निवडणुकीच्या रिंगणात टिकू शकले नाही.
जनतेशी असलेले नाते आणि प्रविण पोटे पाटील-प्रविण पोटे पाटील यांनी यापूर्वी दोनदा विधान परिषदेत केलेल्या नेतृत्वाचा त्यांना मोठा फायदा झाला. गरजूंच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव, पक्षभेद विसरून केलेली विकासकामे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण यामुळे ते मतदारांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. जे मतदार भाजपचे नसले तरीही, पोटे पाटील यांच्या मदतीमुळे त्यांनी त्यांनाच पसंती दिल्याचे चित्र स्पष्ट होते. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात त्यांच्याच नावाचा बोलबाला होता, ज्यामुळे काँग्रेसनेही शेवटी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला असावा, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. एकंदरीत, भाजपच्या शिस्तबद्ध नियोजनापुढे आणि प्रविण पोटे पाटील यांच्या व्यक्तिगत प्रतिमेपुढे विरोधकांचा कोणताही प्रयत्न प्रभावी ठरला नसल्याचे या निकालाच्या पूर्वसंध्येला स्पष्ट झाले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button