डोळ्यांत अश्रू घेऊन माउलीने केले लेकाचे नेत्रदान
सामान्य रुग्णालयातील ह्रदय द्रावक घटना

अमरावती /7 जून : सामान्य रुग्णालय अमरावती येथे राजापेठ अमरावती निवासी 35 वर्षीय तरुण मुलगा निखिल रमेश बनकर आजाराने दगावताच आई सौ कुंदा ताई बनकरने उंबरठा फोडला. आईचे अश्रु थांबत नव्हते, तिचा आक्रोश व वेदना बघून सामान्य रुग्णालयातील कैजुविलिटी वार्ड मधील अन्य रुग्ण, डॉक्टर, नर्स यांना सुद्धा आपले अश्रु थांबवणे अशक्य झाले होते. अश्या या मन हेलाऊन देणार्या वातावरणात आईने अचानक मुलाचा मृतदेह मांडीवर घेऊन त्याच्या नेत्रदानासाठी हाक दिली. हे हृदयस्पर्शी दृश्य बघून सर्वजण स्तब्ध झाले. लगेच वार्डच्या डॉक्टरांनी नेत्रदानाच्या प्रकियेकरिता नेत्र विभाग व हरिना फाउंडेशनशी संपर्क केला. दुःखाच्या डोंगराखालीही अगदी सामान्य कुटुंबातील माऊलीने इतका मोठा साहसी निर्णय घेत सर्वांसमोर आदर्श ठेवला. हृदयद्रावक घटनेतही तुम्हाला नेत्रदानाची आठवण कसी झाली असे त्या मातेला नेत्रदान झाल्या नंतर डॉक्टरांनी विचारताच् आपले अश्रु थांबवत ती आई म्हणाली, मी नेहमी वर्तमान पत्रात हरिना संस्थेच्या नेत्रदानाच्या बातम्या वाचत होते. मलाही वाटायचे कि आपण गेल्यानंतर आपले डोळे दान झाले तर कोणीतरी अंध व्यक्तिसुद्धा पाहू शकेल. पण नियतीने खेळ केला, माझ्याऐवजी मुलगा गेला. माझ्या मनात नेत्रदानच्या भावना आधीपासूनच् रुजल्या असल्यामुळे मला नेत्रदानाची आठवण झाली. माउलीचे ह्या शब्दांनी उपस्थित प्रत्येक व्यक्तिच्या मनात नेत्रदानाची भावना निश्चित निर्माण केली हे स्पष्टपणे दिसत होते. सामान्य रुग्णालयातील डॉ पवार व नीलेश ढेंगळे ,सिस्टर सपना धंदर, समीक्षा भोवते तसेच हरिना चे मनोज राठी ,शरद कासट ,मनीष सावला,राजेन्द्र पचगाड़े यांनी बावविभोर व गंभीर वातावरणात नेत्रदान प्रकिर्या पूर्ण केली.या वेळी मृतक निखिल बनकरचे वडील रमेश बनकर, भाऊ स्वप्निल बनकर सह श्रीराम बनकर, राजेश बनकर, क्रिश बनकर, सुनील बनकर, रोहित बनकर व सर्व उपस्थितांनी नेत्रदाता स्वर्गीय निखिल बनकर याला भावभीनी श्रद्धांजलि दिली. सामान्य रुग्णालय व हरिना फाउंडेशनद्वारे महान माऊली प्रति व बनकर कुटुंबाप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली.




