मालमत्ता कर थकबाकीदारांवर महापालिकेची धडक कारवाई

36 लाखांची वसुली करण्यासाठी दोन मालमत्ता सील

अमरावती/4 जून: अमरावती महानगरपालिकेने मालमत्ता कर थकवणार्‍या बड्या थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम उघडली असून, गुरुवारी राजापेठ भागात 36 लाख 45 हजार रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. महापालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, कर न भरणार्‍यांना आता कठोर भूमिकेचा सामना करावा लागणार आहे. वॉर्ड क्रमांक बी-6 मधील मालमत्ता क्रमांक 807 आणि 807-1 च्या मालकांकडे 6 लाख 16 हजार 15 रुपयांची थकबाकी होती. वारंवार नोटिसा बजावूनही त्यांनी कर भरण्याकडे पाठ फिरवली होती. त्याचप्रमाणे, याच वॉर्डमधील 31-10 या मालमत्तेच्या मालकाकडे तब्बल 30 लाख 29 हजार 128 रुपयांची मोठी थकबाकी प्रलंबित होती. वारंवार मुदत देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर मनपा प्रशासनाने या दोन्ही मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली. सहाय्यक आयुक्त भूषण पुस्तक यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली. यामध्ये नंदा चव्हाण, फैयाज खान, सूरज चावरे, रोशन चव्हाण, धर्म बिवाड आणि विशाल ढोणे यांनी सहभाग नोंदवला. शहराच्या विकासासाठी आणि मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी मालमत्ता कर हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे प्रत्येक मालमत्ता धारकाने कर भरून महापालिकेला सहकार्य करणे आवश्यक आहे, अन्यथा यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button