केंद्र सरकारच्या दडपशाहीचा राजकमल चौकात निषेध
शहरात माकपचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन

अमरावती/1 जून- केरळचे माजी मुख्यमंत्री तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते पिनराई विजयन यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ अमरावतीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शनिवारी सकाळी दहा वाजता राजकमल चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकार राजकीय सुडाच्या भावनेतून केंद्रीय संस्थांचा वापर करत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाचा धिक्कार केला. भांडवली धोरणांचा पुरस्कार करणार्या सरकारकडून डाव्या विचारसरणीच्या नेत्यांवर हा मोठा हल्ला आहे. दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्र सरकारने विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा गैरवापर करत दडपशाही सुरू केली आहे. याच धोरणाचा निषेध नोंदवण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते, सीटू संलग्न संघटनांचे सभासद आणि जनवादी महिला संघटनेच्या पदाधिकार्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे राजकमल चौकातील वातावरण तापले होते. आंदोलनात राज्य समिती सदस्य सुभाष पांडे, रमेश सोनूले, राजेंद्र भांबोरे, प्रभाकर आकोटकर, मुकुंद काळे, सुनील चव्हाण, आशा वैद्य, पद्मा गजभिये, चंदा वानखडे, नीलू मेश्राम, ललिता वासनिक, ज्योती नालट, मीना गवई आणि दुर्गा वासनिक यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारने राजकीय सूडबुद्धीने लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला असून, ईडीसारख्या संस्थांचा वापर करून विरोधकांची मुस्कटदाबी केली जात आहे. डाव्या विचारसरणीच्या नेत्यांना नामोहरम करण्यासाठी सत्तेचा हा गैरवापर सुरू आहे.




