शिवसेनेचे माजी आ.विप्लव बाजोरियांचा बंडाचा झेंडा
जिल्ह्यातल्या शिवसेनेने दाखविली पाठ

अमरावती/1 जुन- हिंगोली-परभणीचे माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनी शिवसेनेची उमेदवारी हुकल्यानंतर थेट अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. वडिलांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेल्या बाजोरियांच्या या धाडसी निर्णयामुळे अमरावतीतील निवडणुकीचे वातावरण अचानक तापले असून, जुन्या जाणत्या मातब्बरांसमोर आता नवे आव्हान उभे राहिले आहे असे भासवल्या जात आहे मात्र, प्रत्यक्षात अमरावती जिल्ह्यातील शिवसेना एकनाथ शिंदे गट प्रवीण पोटे पाटील यांच्या पाठिशी भक्कम उभे राहिल्यामुळे विप्लव बाजोरिया यांची बाजू कमकुवत भासत आहे.
हिंगोली-परभणीच्या राज कारणात कायम सक्रिय असलेल्या बाजोरिया कुटुंबासाठी हा निर्णय आत्मघाती ठरण्यांची शक्यता आहे. माजी आमदार विप्लव बाजोरिया हे हिंगोली-परभणी मतदारसंघातून पूर्वी निवडून आले होते, परंतु यंदा शिंदे गटाच्या शिवसेनेने त्यांना उमेदवारी नाकारली. पक्षनेतृत्वाचा हा निर्णय पचवून पुन्हा मैदानात उतरण्यासाठी त्यांनी थेट अमरावतीची वाट धरली आहे. लक्ष्मी दर्शनाने नगरसेवकांनी आपण खरेदी करु असा त्यांना विश्वास असल्याचे सांगण्यात येत आहे. केवळ पदाच्या लालचे पोटी बाजोरिया येथे आल्यामुळे व त्यांचा अमरावतीशी काहीही संबंध नसल्यामुळे मतदारांनी आज त्यांना पाठ दाखविल्याचे स्पष्ट दिसत होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वडील आणि अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे तीनवेळा आमदार राहिलेले गोपीकिशन बाजोरिया हे सुद्धा उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात समर्थकांच्या मोठा फौजफाट्यासह दाखल होऊन विप्लव बाजोरिया यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला.
राजकीय खेळी अंगाशी येणार-अकोला-वाशिम-बुलढाणा मतदारसंघाचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया हे बाजोरिया कुटुंबातील अनुभवी नेते आहेत. हिंगोली-परभणीत संधी हुकल्यानंतर विप्लव बाजोरिया यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अमरावतीमध्ये आपली राजकीय नवी खेळी सुरू केली आहे. मात्र अमरावती जिल्ह्यातील मतदार त्यांना स्वीकारतील याची अजीबात शक्यता नाही.




