राष्ट्रसंतांच्या सेवकाचा राष्ट्रपतींकडून सन्मान
जनार्दनपंत बोथे गुरुजींना पद्मश्री पुरस्कार प्रदान

अमरावती /25 मे- अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावचे भूमिपुत्र आणि अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांना नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बोथे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार तळागाळात पोहोचवणे आणि ग्रामोद्धाराच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले असून त्यांच्या याच अमूल्य समाजकार्याची दखल देशपातळीवर घेण्यात आली आहे. मोझरी सारख्या खेड्यातून सुरू झालेला हा सेवाप्रवास थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचल्याने संपूर्ण अमरावती जिल्ह्यात सध्या आनंदाचे वातावरण पसरले आहे. ज्येष्ठ समाजसेवक बोथे यांनी वयाची 80 हून अधिक वर्षे अखंडपणे समाजसेवेसाठी समर्पितकेली आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आणि ’ग्रामगीता’ घराघरांपर्यंत, अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य त्यांनी अविरतपणे केले. खेड्यापाड्यांचा विकास कसा करावा आणि गाडगेबाबा व तुकडोजी महाराजांच्या विचारांवर समाज कसा घडवावा याचा वस्तुपाठच त्यांनी आपल्या कार्यातून घालून दिला. या ऐतिहासिक सोहळ्याला दिल्लीत अनेक मान्यवर उपस्थित होते. मोझरीच्या या सुपुत्राने मिळवलेल्या उत्तुंग यशामुळे ग्रामीण भागातील समाजसेवेला एक नवी ऊर्जा मिळाली असून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.




