वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारावर तातडीने उपायोजना करा
आ.सुलभाताई खोडके यांचे निर्देश

ऊर्जा विभागाशी निगडित असलेल्या खासगी यंत्रणांची मदत घेऊन वेळीच दुरुस्ती करण्याची सूचना
अमरावती/22 मे- ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यामध्ये अमरावती शहरात विजेचा मोठा लपंडाव सुरू असून वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, कमी दाबाची समस्या आणि भारनियमनामुळे नागरिक घामाघूम झाले आहेत. या गंभीर समस्येची दखल घेत स्थानिक आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी महावितरण प्रशासनाला धारेवर धरले असून, वीज पुरवठा विनाविलंब सुरळीत करण्यासाठी ऊर्जा विभागाशी निगडित खाजगी यंत्रणांची मदत घेऊन तातडीने दुरुस्ती करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
शहरात उन्हाचा पारा वाढल्याने घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांकडून विजेची मागणी कमालीची वाढली आहे. यामुळे अस्तित्वात असलेल्या जुन्या डीपी रोहित्रांवर (ट्रान्सफॉर्मर) प्रचंड ताण येत असून वारंवार तांत्रिक बिघाड होत आहेत. महावितरणकडे पुरेशी साधने नसल्याने या मोठ्या शहराचा डोलारा सांभाळताना कर्मचार्यांची चांगलीच दमछाक होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. देवहाते यांच्याशी थेट संवाद साधून तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरात नवीन रोहित्रे बसवण्याच्या कामाला काही अवधी लागणार असल्याने, सध्याच्या बिकट परिस्थितीत खाजगी संस्थांच्या तंत्रज्ञांची मदत घेऊन शहरातील तांत्रिक बिघाड आणि ओव्हरलोडिंगच्या समस्या तातडीने दूर कराव्यात, अशी तंबी त्यांनी दिली. नुकत्याच झालेल्या खरीप पूर्व आढावा बैठकीतही आमदार महोदयांनी हा विषय लावून धरला असून, खाजगी यंत्रणेकडून युद्धपातळीवर कामे करून घेण्याबाबत बैठकीत सविस्तर खल झाला असल्याचे सांगितले. ऐन उन्हाळ्यात जनतेला दिलासा देणे गरजेचे असल्याने महावितरणने आता सुस्तपणा सोडून कामाला लागावे, अशी जनतेची भावना आहे.
11 कोटींच्या निधीतुन नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यास सुरुवात
हरातील अनेक भागात निर्माण झालेल्या व्होल्टेज समस्या आणि ओव्हरलोडिंग संदर्भात अडथळे दूर करण्यासाठी आ.सौ.सुलभाताई खोडके यांच्या 11 कोटींच्या विशेष निधी अंतर्गत शहरातील विविध 83 ठिकाणी विद्युत डी.पी.ची क्षमता वाढ व नवीन ट्रान्सफार्मर बसविण्याच्या कामांना महावितरण कडून सुरुवात झाली आहे. या कामांतर्गत विद्यमान ज्या ओव्हरलोडेड डीटीसीचे 200 केव्हीए वरून 315 केव्हीए पर्यंत विस्तारीकरण करण्यात येईल, जेणेकरून कमी व्होल्टेजच्या समस्या व वारंवार डीटीसी ओव्हरलोडिंगच्या समस्या तसेच व्होल्टेजमधील चढ-उताराच्या समस्या टाळता येतील. त्यामुळे सदर डीटीसीवरील विद्यमान ग्राहकांना विश्वसनीय आणि अखंड वीजपुरवठा प्रदान करणे सोयीचे होणार आहे. तसेच व्होल्टेजची समस्या आणि ओव्हरलोडिंग टाळण्यासाठी काही भागात डीटीसीचे 100 केव्हीए , 200 केव्हीए आणि 315 केव्हीए क्षमतेचे नवीन ट्रान्सफार्मर सुद्धा बसविण्याच्या कामांना वेग आला आहे.




