ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात तीव्र आंदोलन
जिल्हाधिकार्यांना औषध विक्रेत्यांचे निवेदन

अमरावतीतील औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद
अमरावती/20 मे– देशभरातील औषध विक्रेत्यांच्या संघटनेने पुकारलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला अमरावती शहरात उत्स्फूर्त आणि ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला. मानवी आरोग्याशी थेट खेळणार्या ऑनलाईन औषध व्यापाराला तातडीने आळा घालावा.
या मुख्य मागणीसाठी अमरावतीमधील तमाम औषध विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळला. रणरणत्या उन्हात काढलेल्या भव्य पायी मोर्चामार्फत जिल्हाधिकार्यांना सहा प्रमुख मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. कॉर्पोरेट कंपन्यांची मक्तेदारी आणि बनावट प्रिस्क्रिप्शनवर होणारी औषध विक्री थांबवून किरकोळ विक्रेत्यांना न्याय देण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली. मानवी जीवनावर गंभीर परिणाम करणार्या ऑनलाईन औषध व्यापाराच्या विरोधात ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनच्या आवाहनावरून पुकारण्यात आलेला राष्ट्रव्यापी बंद अमरावतीत पूर्णपणे यशस्वी झाला. शहरातील औषध विक्रेत्यांनी या निमित्ताने अभूतपूर्व एकजूट दाखवून दिली. सकाळी 11 वाजताच्या सुमारास 42 ते 43 अंश सेल्सिअसच्या कडक उन्हाची तमा न बाळगता, असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ मालानी, उपाध्यक्ष मनोज डफळे आणि सचिव राजा नानवानी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य पायी मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात शेकडो औषध व्यावसायिक हाताला काळ्या फित्या बांधून आणि आपल्या मागण्यांचे फलक हातात धरून सहभागी झाले होते. जिल्हाधिकार्यांना सोपवलेल्या तीन पानांच्या विस्तृत निवेदनात केंद्र सरकारकडे मुख्यत्वे सहा मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. यामध्ये बड्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणारी औषध क्षेत्रातील अनैतिक स्पर्धा, ई-फार्मसीचे बेकायदेशीर व अनियंत्रित संचालन, तसेच 28 ऑगस्ट 2018 ची अधिसूचना 817 ई आणि 26 मार्च 2020 ची अधिसूचना 220 ई त्वरित रद्द करण्याचा समावेश आहे.
या निवेदनाद्वारे औषध विक्रेत्यांनी अनियंत्रित ई-फार्मसीमुळे आरोग्याला निर्माण झालेल्या गंभीर धोक्यांकडे प्रशासनाचे तीव्र लक्ष वेधले. ऑनलाईन औषध विक्री मंचावर औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्यांतर्गत असणारे नियम 1945 चे उघडउघड उल्लंघन होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवून कोणत्याही तपासणीशिवाय औषधे पुरवली जात आहेत. डॉक्टरांच्या चिठ्ठीचा म्हणजेच प्रिस्क्रिप्शनचा वारंवार बेकायदेशीर वापर करणे, बनावट चिठ्ठ्यांच्या आधारे अतिवेगवान अमली व व्यसन लावणारी औषधे घरपोच पुरवणे अशा प्रकारांमुळे तरुण पिढी धोक्यात आली आहे. या आंदोलनात अमरावतीमधील औषध व्यावसायिक दीपक सोमय्या, संजय बोबडे, प्रवीण देशमुख, अनिल टाले, तुषार कासट, विवेक कालबांडे, दीपक नथानी, अंशुल अग्रवाल, विजय खत्री, कौशल सारडा, निखिल देशमुख, गोविंदा केला, तन्वीर पटेल, अरुण चौधरी, रवी तोटे, सुयोग लड्ढा, रितेश बुब, गोपाळ बागडी, साबीर भाई, गौरव राऊत, तोहसीफ अहमद, अजय ढोरे, भारती मोहोकार, आनंद अग्रवाल, अतुल देशमुख, गणेश गावंडे, प्रतीक वसंत, महेश बुथ, श्याम जाजू, तुषार भोयर, राजेश निंभोरकर, अमन पेलागडे, विजय खंडेलवाल, ललित राठी,ु पार्थ खंडेलवाल, श्रीकांत राजूरकर, हेमंत घोरे, गणेश केडिया, नंदकिशोर भुसारी, राहुल श्यामदासानी, बजरंग खंडेलवाल, नईम भाई, स्वप्नील सुराणा, अमीन भुरा, कुलभूषण मालवीय, राजा टांक, अरुण गुप्ता, कविता लोले, वेदांत सारडा, योगेश उमप, विक्रम सरोदे, राजू टेकाडे, सचिन शिरभाते, रणजीत मोझरीकर, कुलदीप कात्रे, रुपेश साबळे, प्रकाश बनारसे, प्रवीण गजभिये, धीरज देशामुख, मनोज गुल्हाने, आशिष बंदे, सतीश कानुगा, प्रवीण लड्ढा, चेतन कुबडे, नरेंद्र वानखडे, अमित येवले, राहुल वानखडे, राजेश निकम, राजू बहुरूपी, अंकुश मोघे, धनंजय मेंढे, सुदेश भेले, संदीप चांडक, पवन अग्रवाल, मनोज कटारिया, जावेद खान, तुषार गणेशन, गोपाळ लोंढे, विलास कुरळकर आणि धर्मराज परळीकर आदी प्रमुख पदाधिकारी व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेकायदेशीर ऑनलाईन औषधविक्री थांबवा-इंटरनेटवरून विनापासणी औषध पुरवठा सर्रास सुरू असून नियमांची पूर्ण पायमल्ली होत आहे. डॉक्टरांच्या बनावट चिठ्ठ्यावरून होणारी व्यसनकारक औषधांची विक्री थांबवून रुग्णांचे आरोग्य वाचवणे गरजेचे आहे. त्यासाठीच हा लढा आहे.




