चिखलदर्यात रंगली श्री हव्याप्र मंडळाची राष्ट्रीय योगासन स्पर्धा
देशभरातील 104 स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग

* योग, शिस्त आणि क्रीडासंस्कारांचा संगम
अमरावती/17 मे-शरीर आणि मनाचा सुंदर समतोल साधत निरोगी आरोग्याचा मूलमंत्र देणारी राष्ट्रीय योगासन स्पर्धा चिखलदर्याच्या विहंगम पठारावर प्रचंड उत्साहात पार पडली. स्थानिक श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळा संचलित शारीरिक शिक्षण पदवी महाविद्यालय, अमरावती यांच्या पुढाकाराने भारतीय योगासन महासंघ आणि बृहन्महाराष्ट्र योग परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 16 मे रोजी सकाळी ठीक 10 वाजता एका दिमाखदार सोहळ्यात या स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय योगमहर्षी प्रा. डॉ. अरुण खोडस्कर होते, तर उद्घाटक म्हणून प्रा. सतीश मोहगावकर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. श्रीकांत चेंडके, प्रा. डॉ. विशाल खोडस्कर आणि ज्येष्ठ समाजसेवक अशरफ भाई यांची प्रमुख उपस्थिती होती. तत्पूर्वी, सकाळी 9 वाजता परीक्षक आणि पालकांची बैठक पार पडली. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र अशा विविध राज्यांतील एकूण 104 अव्वल खेळाडूंनी चिखलदर्यात हजेरी लावून आपल्या अद्भूत आणि लवचिक योगासनांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यानंतर महर्षी पतंजली सभागृह आणि स्वामी कुवलयानंद सभागृहामध्ये वेगवेगळ्या वयोगटांतील चुरशीच्या लढती रंगल्या. यात 8 ते 15 वर्षे, 15 ते 22 वर्षे, 22 ते 30 वर्षे, 30 ते 40 वर्षे, 40 ते 55 वर्षे आणि 55 वर्षांवरील महिला व पुरुषांच्या स्वतंत्र फेर्या पार पडल्या. आजच्या तणावाच्या युगात तरुणांनी योगासनाला प्राधान्य देणे गरजेचे असून यामुळे राष्ट्रीय एकात्मता वाढते, असा सूर मान्यवरांनी व्यक्त केला. या सोहळ्यासाठी प्रा. डॉ. सुनील लाबडे, प्रा. नितीन काळे, प्रा. प्रवीण अनासाने, प्रा. डॉ. विशाल खोडस्कर, प्रा. प्रतीक पाथरे, प्रा. अर्चना देशपांडे, प्रा. प्रणय पवार, प्रा. संपदा आगरकर, प्रा. सुषमा शिरभाते, प्रा. प्रतीक कळंबे, प्रा. आंचल राहते, प्रा. सुकन्या देशमुख, प्रा. संदीप मांडळे आणि प्रा. वैष्णवी जाधव यांनी मोलाचे योगदान दिले.




