राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात दांपत्य ठार
बडनेरा जवळील वरुडा फाट्यावर बसने दुचाकीला चिरडले

मृतक पाळा-दाभा येथील रहिवासी; चालक ताब्यात
अमरावती/14 मे- बडनेरा शहरालगतच्या वरुडा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास काळीज पिळवटून टाकणारी एक भीषण घटना घडली. एका भरधाव खाजगी प्रवासी बसने मोपेड दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने पाळा दाभा येथील तरुण पती-पत्नीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या अपघातामुळे महामार्गावर काही काळ भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले होते. पुरण कोठार आणि त्यांची पत्नी आपल्या गावाकडे जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. पोलिसांनी या घटनेतील बस आणि चालकाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुरण कौशल कोठार (वय 21 वर्ष, रा. पाळा दाभा) हे आपल्या पत्नीसह एम एच 27 सी ई 0291 क्रमांकाच्या दुचाकीवरून बडनेरा येथील पवन नगर भागातून स्वतःच्या गावी जाण्यासाठी निघाले होते. ही दोघं वरुडा फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना, नागपूरकडून येणार्या एम एच 37 डब्ल्यू 8111 क्रमांकाच्या सुसाट खाजगी बसने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, पती-पत्नी दोघेही रस्त्यावर दूरवर फेकले गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या दांपत्याला पाहून बघ्यांचेही डोळे पाणावले होते. अपघाताचा आवाज ऐकताच वरुडा गावातील नागरिकांनी आणि महामार्गावरून प्रवास करणार्या लोकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. बडनेरा पोलीस पथकाने वेगाने हालचाली करत दोघांनाही उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान पुरण कोठार यांची प्राणज्योत मालवली, तर त्यांच्या पत्नीला डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषित केले. मृत पुरण यांच्या खिशात मिळालेल्या ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली आहे, मात्र त्यांच्या पत्नीचे नाव अद्याप अधिकृतपणे समजू शकलेले नाही. बडनेरा पोलिसांनी या अपघातातील प्रवासी बस जप्त केली असून चालकावर निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे. दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलीस आता त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. या भीषण घटनेमुळे पाळा दाभा परिसरावर शोककळा पसरली असून महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ओळखपत्रावरून पटली मृताची ओळख -वरुडा फाट्यावर झालेल्या या काळजाचा थरकाप उडवणार्या अपघातात मृत पावलेला तरुण नेमका कोण हे सुरुवातीला कुणालाच समजत नव्हते. मात्र पोलिसांनी मृताची तपासणी केली असता त्याच्या खिशात असलेल्या ओळखपत्रावरून (क्रमांक गोपनीय) त्याचे नाव पुरण कौशल कोठार असल्याचे समोर आले. याच आधारे पोलीस आता पाळा दाभा येथील त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.




