शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आयोजनावर शिक्कामोर्तब

पुणे/11 मे: महाराष्ट्र साहित्य परिषदच आगामी शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करणार असल्याचे साहित्य महामंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे. पुढील बैठक येत्या 14 जून रोजी पुण्यात होणार असून, या बैठकीत साहित्य संमेलनाचे स्थळ ठरणार आहे. या संमेलनासाठी सहसंयोजक म्हणून पुणे पुस्तक महोत्सव आणि पुणे नगर वाचन मंदिर यांच्याकडून सहआयोजकाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. साहित्य महामंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पत्रकार परिषदेत दिली. साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर या वेळी उपस्थित होते. साहित्य महामंडळाचे प्रभारी अध्यक्ष गुरय्या रे. स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सोमण, महाळंक आणि निफाडकर यांनी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली. स्वामी यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांच्या जागी पुरुषोत्तम सप्रे (भोपाळ) यांची महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे. तसेच, या वेळी साहित्य संमेलन स्थळ निवड समितीची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, कोषाध्यक्ष यांच्यासह प्रतिभा सराफ (मुंबई मराठी साहित्य संघ), रामचंद्र काळुंखे (मराठवाडा साहित्य परिषद) आणि लखनसिंह कटारे (विदर्भ साहित्य संघ) यांचा समावेश आहे. पत्रकार परिषदेला मसापचे कार्यवाह सुनील महाजन आणि प्रसाद मिरासदार उपस्थित होते.




