दर्यापूर तहसील आवारात ट्रॅक्टर चालकाने अंगावर ओतले डिझेल
तहसीलदारांच्या अवैध ‘वसुली’ विरोधात आत्मदहनाचा भडका

साठ हजारांच्या लाचेमुळे टोकाची भूमिका; नागेश वावरे यांचा वसुलीसाठी ट्रॅक्टर जप्त
दर्यापूर/28 एप्रिल- तालुक्यातील महसूल प्रशासनाचा माज आणि अधिकार्यांच्या मनमानी कारभाराचा आज तहसील कार्यालयाच्या आवारात स्फोट झाला. नियमानुसार रॉयल्टी भरून व्यवसाय करणार्या करवखेडे येथील नागेश वावरे या तरुणाचा छळ करून त्याच्याकडून तब्बल साठ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. कागदपत्रे असतानाही केवळ वसुलीसाठी ट्रॅक्टर जप्त केल्याने संतापलेल्या नागेशने आज भरदिवसा स्वतःवर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुदैवाने,पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने एक निष्पाप बळी जाता जाता वाचला, मात्र या घटनेने महसूल विभागातील भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले आहेत. दर्यापूर तालुक्यातील वाळू घाटांवर सध्या अधिकार्यांच्या वरदहस्ताने लूट सुरू असताना, नियमाने वाळू उपसा करणार्या नागेश वावरे याला तहसीलदार रवींद्रकुमार काणदजे आणि त्यांच्या पथकाने लक्ष्य केले. नदीपात्राच्या बाहेर असलेला ट्रॅक्टर बळजबरीने जप्त करून तो तहसील कार्यालयात लावला. हा ट्रॅक्टर सोडण्यासाठी साठ हजार रुपयांच्या चिरीमिरीची मागणी करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप नागेशने केला आहे. वारंवार विनवणी करूनही अधिकारी ऐकत नसल्याने अखेर व्यवस्थेला कंटाळून या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. या प्रकारानंतर करवखेडे येथील सरपंचांनीही प्रशासकीय हुकूमशाहीवर तोफ डागली असून तहसीलदारांच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली. याउलट, तहसीलदार रवींद्रकुमार काणदजे यांनी नागेशवरच अवैध व्यवसायाचे शिक्के मारून आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. एका तरुणाला मृत्यूच्या दारात ढकलणार्या या संतापजनक प्रकारामुळे दर्यापूर शहरात खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.




