ट्रॅव्हल्स-स्कॉर्पिओच्या धडकेत पाच ठार, 12 गंभीर

लग्नाच्या वर्‍हाडावर काळाचा घाला

गडचिरोली /29 मार्च : नियतीचा खेळ किती क्रूर असतो, याचा विदारक प्रत्यय रविवारी सायंकाळी चामोर्शी तालुक्यातील तळोधी परिसरात आला. लग्नाचा सोहळा आटोपून आनंदाने घरी परतणार्‍या वर्‍हाड्यांच्या वाहनाला समोरून येणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सने भीषण धडक दिली. या अपघातात 8 वर्षांच्या चिमुकलीसह पाच जण जागीच ठार झाले, तर 12 जण मृत्यूशी झुंज देत आहेत.
तळोधी महामार्गावरील नवीन पेट्रोल पंपासमोर सायंकाळी 6 च्या सुमारास हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, कुरुल रामपूर येथील विवाह सोहळा आटोपून 16 वर्‍हाडी स्कॉर्पिओने भाडभीडीकडे परतत होते. गाडीत लग्नाची गाणी आणि हास्यविनोद सुरू असतानाच, गडचिरोलीकडून येणार्‍या ‘प्रवीण टुर्स अँड ट्रॅव्हल्स’च्या बसने स्कॉर्पिओला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, स्कॉर्पिओचा अक्षरशः चक्काचूर झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता, तर जखमींच्या किंकाळ्यांनी परिसराचा थरकाप उडाला. या अपघातात कुणघडा येथील विमल कान्हुजी गव्हारे, सुमन देवाजी गव्हारे, भडभीडी येथील अनिकेत साईनाथ बरलावार आणि गट्टेगुडा येथील 8 वर्षांची चिमुकली आरोही मोगरकर यांचा जागीच मृत्यू झाला. ऐन बालपणीच आरोहीचा असा करुण अंत झाल्याने गट्टेगुडा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रक्ताने माखल्या लग्नाच्या अक्षता-काही तासांपूर्वी ज्यांच्या हातावर लग्नाची मेहंदी होती आणि डोक्यावर अक्षता होत्या, त्याच वर्‍हाड्यांवर काळाने झडप घातली. महामार्गावर विखुरलेले लग्नाचे सामान आणि रक्ताने माखलेल्या अक्षता पाहून प्रत्यक्षदर्शींचेही डोळे पाणावले. वरातीचे रूपांतर अंत्ययात्रेत झाल्याच्या भावनेने संपूर्ण चामोर्शी तालुका हळहळत आहे. तळोधी महामार्गावर वाहनांच्या वेगावर मर्यादा नसल्याने हे रस्ते आता ‘डेथ ट्रॅप’ ठरत आहेत. नवीन पेट्रोल पंपासमोरील वळण रस्ता धोकादायक बनला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निरपराध लोकांचे बळी जात असल्याचा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

12 जखमींची प्रकृती चिंताजनक

अपघातात स्कॉर्पिओ चालक गुरुदास वासेकर यांच्यासह 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. बहुतेकांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीणकुमार कीलनाके यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलवले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button