भीषण अपघातात हिवरखेडचे दोन तरुण ठार
मुलताई मार्गावर ट्रक आणि पिकअपची धडक

हिवरखेड /23 मार्च : मुलताई-छिंदवाडा महामार्गावर सोमवारी दुपारी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात हिवरखेड येथील दोन उमद्या तरुणांसह ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. घाटपिंपरी जवळ मालवाहू वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या या समोरासमोर धडकेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, हिवरखेड गावावर शोककळा पसरली आहे. ऐन उमेदीच्या काळात दोन तरुणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने चावके आणि तडस कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिवरखेड येथील प्रज्वल ज्ञानेश्वरराव चावके (वय 22) आणि भूषण मधुकरराव तडस (वय 29) हे दोघे आपल्या मालवाहू वाहनाने मुलताईहून छिंदवाड्याकडे जात होते. घाटपिंपरीपासून काही अंतरावर समोरून येणार्या भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, पिकअप वाहनाचा अक्षरशः चक्काचूर अवघ्या बावीस आणि एकोणतीस वर्षांच्या दोन कर्तबगार तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण हिवरखेड परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




