प्रीमियम पेट्रोलच्या दरात 2.35 रुपयांची वाढ
सामान्य पेट्रोलचे दर स्थिर

* प्रीमियम पेट्रोल 114.54 रुपये प्रति लिटर
अमरावती /20 मार्च – सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी सामान्य पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल न करता, आज दुपारपासून प्रीमियम पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2 रुपये 35 पैशांची वाढ केली आहे. ही दरवाढ तात्काळ लागू झाली असून, अमरावतीमध्ये आता 112.19 रुपयांना मिळणारे प्रीमियम पेट्रोल 114.54 रुपये प्रति लिटर झाले आहे. आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल या तिन्ही प्रमुख कंपन्यांनी ही दरवाढ जाहीर केली आहे. मात्र, सर्वसामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे सामान्य पेट्रोल जुन्याच दराने उपलब्ध असेल. पेट्रोल पंप चालकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीत प्रीमियम पेट्रोलचा वापर मर्यादित असून, दररोज साधारण 1000 ते 1200 लिटर विक्री होते. जागतिक बाजारपेठेत आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. 73 डॉलर प्रति बॅरल असलेले कच्चे तेल आता 140 डॉलरच्या पार गेले आहे. असे असूनही भारतात तेल कंपन्यांनी सामान्य पेट्रोल आणि डिझेलचे दर न वाढवल्यामुळे सध्या तरी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
इंधन दरवाढ-जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले असतानाही भारतात केवळ प्रीमियम पेट्रोल महागले आहे. अमरावतीत नवीन दर लागू झाले असून, सामान्य पेट्रोल व डिझेलचे भाव स्थिर असल्याने वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.




