महावितरणच्या पुनर्रचनेवरून प्रशासन-संघटनेत जुंपणार

उपविभागीय कार्यालयांच्या संख्येत घट

-कामगार कपातीचीही शक्यता
अमरावती / 16 मे: महावितरणच्या पुनर्रचनेच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे महावितरणच्या उपविभागीय कार्यालयांच्या संख्येत घट होऊन कामगार कपातीचीही शक्यता आहे. या प्रकाराला कामगार संघटनांचा विरोध आहे. त्यामुळे महावितरणच्या पुनर्रचनेवरून प्रशासन व कामगार संघटनेत जुंपण्याची शक्यता आहे. महावितरणचे राज्यात सध्या तीन कोटींपर्यंत वीज ग्राहक आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात विद्युत यंत्रणेचे जाळे असून त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात तांत्रिक कर्मचार्‍यांची आवश्यकत आहे.
महावितरणचे मुख्यालय मुंबईत प्रकाशगड येथे आहे. नागपूर, छत्रपती संभाजी नगर, कोकण आणि पुणे येथे चार प्रादेशिक कार्यालये, 16 झोन कार्यालये, 44 सर्कल (जिल्हा) कार्यालये, 145 विभागीय (डिव्हीजन) कार्यालये, 646 उपविभाग कार्यालये आहेत. सोबत ग्राहकांना त्यांच्या भागात (गावात) सेवा देण्यासाठी 3 हजार 247 शाखा कार्यालये आहेत. महावितरणच्या पुनर्रचनेत विभागीय व उपविभाग कार्यालय कमी करण्याचे संकेत मिळत आहेत. उपविभाग कार्यालयासाठी ग्राहकांची संख्याही पूर्वीच्या तुलनेत दुप्पट करण्याचा विचार सुरू आहे. यामुळे कामगार संघटना संतापली आहे. महावितरणच्या पुनर्रचनेबाबतच्या बैठकीत कामगार कपात व उपविभागीय कार्यालय कमी करण्याला कडाडून विरोध झाला. कर्मचारी व कार्यालय कमी झाल्यास ग्राहक सेवेवर गंभीर परिणाम होणार असल्याचा इशारा संघटनेने दिला.
पुनर्रचनेचा विषय मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चर्चेला येणार होता. परंतु अद्याप मसूदा अधिकृतरित्या पुढे आलेला नाही. त्यामुळे महावितरणच्या अधिकृत पुनर्रचना मसुद्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या विषयावर कुणीही अधिकृत बोलायला तयार नाही, हे विशेष. कामगारांची सर्व रिक्त पदे भरा, पुनर्रचनेत कामगार कपात नको, प्रथम उपविभाग कार्यालय वाढवा, अशा मागण्या पुनर्रचनेसाठीच्या बैठकीत केल्या होत्या. या मागण्या मान्य न केल्यास याविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button