पीडीएमसीत प्रेतावरच्या दागिण्यांची चोरी

मृत महिला बडनेर्‍याची, संतप्त नातेवाईकांचा रुग्णालयात राडा

अमरावती / 8 फेब्रुवारी : शहरातील प्रतिष्ठित मानल्या जाणार्‍या पीडीएमसी रुग्णालयात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
बडनेरा येथील 50 वर्षीय नलिनी अनिल श्रीरामवार या महिलेचा डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, मात्र त्यांच्या निधनानंतर काही वेळातच मृतदेहावरील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेमुळे संपूर्ण अमरावती शहरात खळबळ उडाली असून रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर आणि सुरक्षिततेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नलिनी श्रीरामवार यांची प्रकृती शनिवारी सायंकाळी अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने पीडीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र रविवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच, जेव्हा नातेवाईकांनी नलिनी यांचा मृतदेह पाहिला, तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांच्या गळ्यातील मंगलसूत्र जागेवर होते, मात्र कानातील सोन्याचे महागडे झुमके गायब होते. मृतदेहावरील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच नातेवाईकांचा संयम सुटला आणि त्यांनी रुग्णालय परिसरात जोरदार हंगामा सुरू केला. मृताच्या पतीने रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करताना सांगितले की, रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी केवळ निष्काळजीपणाच केला नाही, तर विचारणा केली असता अत्यंत अभद्र आणि मुजोरपणे वागणूक दिली. या चोरीमध्ये रुग्णालयातीलच एखाद्या टोळीचा हात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच गाडगे नगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संतप्त जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांची कसून चौकशी सुरू केली आहे. तपासाअंती या प्रकरणातील दोषींवर कठोर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

पांढर्‍या कोटाआड लपलेत चोर?

रुग्णालयात रुग्ण वाचवण्यासाठी येतात की लुटले जाण्यासाठी, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. नलिनी श्रीरामवार यांच्या मृतदेहावरील दागिन्यांची चोरी ही केवळ साधी चोरी नसून, तो मृतदेहाचा अपमान आहे. गाडगे नगर पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्याने तपास सुरू केला असून, सीसीटीव्हीमधील संशयास्पद हालचालींवरून लवकरच चोरांच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Back to top button