अविनाश मार्डीकर राष्ट्रवादीचे गटनेते

अमरावती / 25 जानेवारी – अमरावती महानगरपालिकेत राष्ट्र वादीने गट स्थापन केला असुन गटनेतेपदी अविनाश मार्डीकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. संजय खोडके यांच्या गाडगेनगर स्थित निवासस्थानी आज रविवारी दुपारी 1 वाजता झालेल्या पक्षाच्या बैठकीत गटनेते पदाची निवड घोषीत करण्यात आली. बैठकीत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नवनिर्वाचित 11 नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवक प्रमोद महल्ले यांनी गटनेते पदासाठी अविनाश मार्डीकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला नगरसेवक मनीष बजाज यांनी अनुमोदन दिले. सभेला आ. सुलभाताई खोडके, माजी महापौर अ‍ॅड. किशोर शेळके, प्रशांत डवरे, यश खोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीदरम्यान झालेल्या अनौैपचारीक चर्चेतुन मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिका सत्ता स्थापनेत राष्ट्रवादी पक्ष सहभागी होणार आहे. राज्यामधील महायुतीचे सरकारमध्ये राष्ट्रवादी पक्ष सहभागी असुन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अर्थमंत्री आहेत. अमरावती महापालिकेत भाजप सत्ता स्थापन करेल तेव्हा राष्ट्रवादी पक्ष सत्तेत सहभागी असेल हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अमरावती शहराच्या आ. सौ. सुलभाताई खोडके व विधानपरीषद सदस्य संजय खोडके महायुतीच्या घटक असल्यामुळे महापालिकेतही महायुतीचीच सत्ता स्थापन होईल याची बैठकीतही चर्चा होती. मात्र याबाबतचा अंतीम निर्णय व सत्तेतील वाटा ठरविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री व पक्षप्रमुख अजितदादा पवार घेतील. असे सांगण्यात आले. अमरावती महानगरपालिकेत युवा स्वाभिमान पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला तर राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार नाही अशी यापुर्वी आ. संजय खोडके यांनी घोषणा केली होती. मात्र आता राष्ट्रवादीचा सुर बदलला असुन राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार असल्याने अनेक चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button