भारत आशिया चषक चॅम्पियन; पाकिस्तानचा 5 विकेट्सने धुव्वा
तिलक वर्मा विजयाचा हिरो

* कुलदीपच्या 4 विकेट
दुबई /28 सप्टेंबर – भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत आशिया चषक आपल्या नावे केला आहे. तिलक वर्मा भारताच्या विजयाचा हिरो ठरला, तर रिंकू सिंहने अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत भारताचा विजय पक्का केला. भारताला अखेरच्या षटकात 6 चेंडूत 10 धावांची गरज होती. 19व्या षटकात फहीम अश्रफने अखेरच्या चेंडूवर शिवम दुबेला झेलबाद केलं, त्यानंतर अखेरच्या षटकासाठी रिंकू सिंह फलंदाजीला आला. पहिल्या चेंडूवर तिलक व रिंकूने 2 धावा केल्या, तिलकने दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावला आणि भारताचा विजय पक्का झाला. पाकिस्तानने दिलेल्या 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात प्रचंड वाईट झाली; पॉवरप्लेमध्ये 3 मोठ्या विकेट्स गमावल्या. अभिषेक 5, गिल 12 आणि सूर्यकुमार यादव 1 धावा करत बाद झाले. त्यानंतर तिलक वर्माने संजू सॅमसनच्या साथीने भारताचा डाव सावरला, अर्धशतक करत मैदानावर पाय घट्ट रोवून उभा राहिला; संजू 24 धावा करत बाद झाला. तिलकने शिवम दुबेसह अर्धशतकी भागीदारी केली, तर शिवमनेही चांगली साथ दिली, आणि तिलक भारतासाठी सामन्यात तारणहार ठरला. पाकिस्तानकडून फहीम अश्रफने तीन विकेट्स घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली, तर अबरार अहमद आणि शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. भारताने नाणेफेक जिंकत पाकिस्तानला फलंदाजीसाठी पाठवले; पाकिस्तानची सुरूवात चांगली झाली, सलामीवीरांनी 84 धावांची भागीदारी रचली. पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानने 56 धावा केल्या; फरहानने अर्धशतक झळकावलं, फखर जमानने 46 धावा केल्या, पण वरूण चक्रवर्तीने भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिले. पाकिस्तानचे सलामीवीर वगळता इतर सर्व फलंदाज फेल ठरले, 3 फलंदाजांनी तर खातंही उघडलं नाही. कुलदीप यादवने उत्कृष्ट गोलंदाजी करत 4 विकेट्स घेतल्या, तर बुमराह, अक्षर पटेल आणि वरूण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या; यासह पाकिस्तानचा संघ 146 धावांवर सर्वबाद झाला.




