विनयभंगाच्या तक्रारीवरून युवकाची हत्या

वाशिम जिल्ह्यातील आमखेड गावात थरारक घटना

* तीघांची प्रकृती गंभीर

वाशिम/23 ऑक्टोबर : वाशिम जिल्ह्यातील आमखेड गावात दिवाळी पाडव्याच्या दिवशी भयानक घटना घडली, ज्यात छेडछाडीच्या पोलिस तक्रारीवरून दोन गटांमध्ये झालेल्या वादात एकाचा मृत्यू झाला आणि तीन जण गंभीर जखमी झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फुलयंती नेमीचंद चव्हाण (52) यांनी त्यांच्या मुलगी रंगीला हिचा विनयभंग झाल्याची पोलिस तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर आक्षेप घेऊन आरोपी दादाराव पवार यांनी त्यांच्या साथीदारांसह चाकूने प्राणघातक हल्ला केला आणि जोरदार दगडफेक केली. या हल्ल्यात फुलयंतीच्या मुलगा अविनाश गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला, तर त्याचे वडील, दुसरा मुलगा आणि सून देखील गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपी त्यांच्या दोन मोटारसायकली सोडून पळून गेले.

माहिती मिळताच जऊळका पोलीस घटनास्थळी पोहोचले, पंचनामा तयार केला आणि जखमींना वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये स्वाती चव्हाण, संदेश नेमीचंद चव्हाण आणि नेमीचंद चव्हाण यांचा समावेश आहे. आरोपींची नावे राजू रामचंद्र पवार (गिव्हा कुटे), दादाराव गंभीर पवार (वाघी बु.), पवन गजानन चव्हाण (बोराळा धनगर), अजय गजानन चव्हाण (बोराळा धनगर) आणि अशोक रामचंद्र पद्मार (वाघी बु.) अशी आहेत. त्यांच्या विरुद्ध भादंविच्या कलम 103, 109, 189(2), 191(2), 191(3) आणि 190 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून जऊळका पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दिवाळीच्या पाडव्याला घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून, कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button