दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू

एक वाचला, दुर्गादेवीच्या विसर्जनाला गालबोट

* दारोडा गावावर शोककळा पसरली

वर्धा/3 ऑक्टोबर : दोन दिवसांपासून जिल्ह्यात नवरात्र उत्सवातील देवीच्या विसर्जनाची धामधूम सुरू आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक देवी उत्सव साजरा केला जात असतो, पण यावेळी विसर्जन सोहळ्यास गालबोट लागले. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावातील दोन युवकांचा वणा नदीत बुडून मृत्यू झाला असून एकाला मात्र वेळेत वाचविण्यात यश आले. हर्षल नथुजी चाफले (वय 24) आणि विशाल मनोहर पोहाणे (वय 25) अशी मृतकांची नावे असून ते दोघेही दारोडा येथील रहिवासी होते. देवी विसर्जनासाठी ते नदीकाठी गेले असता विसर्जनाच्या वेळी पाण्यात तोल जाऊन दोघेजण वाहून गेले. आज सकाळी सुरू झालेल्या शोध मोहिमेत घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर टेम्बा शिवारात दोन्ही युवकांचे मृतदेह सापडले, तर त्यांच्यासोबत असलेल्या भोजराज मेश्राम याला ग्रामस्थांनी वाचवले. गुरुवारी रात्रभर शोधाशोध सुरू होती. दसर्‍याच्या दिवशी दोन तरुणांचे प्राण गेल्याने दारोडा गावावर शोककळा पसरली असून एकाच गावात दोन अंत्यसंस्कार असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता पाळण्याचे आवाहन केले असून गुन्हे दाखल झाले नाही असा गैरसमज असल्याचे स्पष्ट करत कठोर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button