हे विधिमंडळ माझ्या खिशात, अधिकार्‍याच्या वल्गना

अनिल परब यांचा सभागृहात गंभीर आरोप

नागपूर /9 डिसेंबर : राज्यातील जलसंधारण विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. आवश्यक असलेल्या दराच्या सात ते आठव पटींनी निविदा काढल्या जात आहेत. बोगस कंत्राटदार पोसले जात आहेत. या विभागाचे संचालक सुनील कुशिरे सांगतात की, ते सभागृहात लक्षवेधी किंवा प्रश्न लागूच देणार नाही, हे संपूर्ण विधिमंडळच माझ्या खिशात असल्याची वक्तव्ये कुशिरे बाहेर करीत असल्याचा खळबळजनक आरोप परिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी मंगळवारी विधान परिषदेत केला.
अनिल परब यांनी तारांकित प्रश्नाद्वारे हा मुद्दा उचलला होता. मौजे सारंगवाडी (जि. बुलढाणा) आणि वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील कामात मोठ्या प्रमाणात अनियमतिता झाली. निविदा 10 कोटींची असताना 80 कोटींपर्यंत कामे वाढविण्यात आली. असा प्रकार संपूर्ण राज्यात झाला. 2 हजार कोटींची तरतूद असताना 18 हजार कोटींची प्रशासकीय निधी देण्यात आला, असा आरोप अनिल परब यांनी केला. यापूर्वी लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो लागला नाही. या प्रकरणी काहीच होणार नसून प्रश्नही लागणार नाही, संपूर्ण विधिमंडळच माझ्या खिशात असल्याचे दावे संचालक सुनील कुशिरे बाहेर करीत आहेत, असं अनिल परब म्हणाले. त्यांनी संबंधित अधिकार्‍याला निलंबित करून चौकशी करण्याची मागणी केली.
अखेर एसआयटी चौकशी-यावर मंत्री संजय राठोड यांनी भूमिका मांडली. संबंधित अधिकार्‍यांविरुद्ध तक्रारी प्राप्त झाल्या असून चौकशी सुरू आहे. या अधिकार्‍याची बदली करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, राठोड या भ्रष्ट अधिकार्‍याला पाठीशी घालत असल्याचा आरोप परब आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शिशिकांत शिंदे यांनी केला. कारवाईसाठीची त्यांची आक्रमक भूमिका लक्षात घेता अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करू, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

संबंधित बातम्या

Back to top button