खारपाण पट्टा 7 वर्षात होणार समूळ नष्ट
आ. संजय कुटे यांनी व्यक्त केला विश्वास

* गोड पाणी उपलब्ध होईल
नागपूर /8 जून– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे येत्या 6-7 वर्षांत विदर्भातील खारपाण पट्टा समूळ नष्ट होऊन गोड पाणी उपलब्ध होईल तसेच शेत जमीन सुपीक होईल, असा विेशास आ. संजय कुटे यांनी रविवारी येथे व्यक्त केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व जनकल्याणकारी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय विदर्भ पाणी परीषद वनामती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. आजच्या दुसर्या दिवशी सकाळी विदर्भातील कृषी योग्य पाणी सद्यस्थिती समस्या व उपाययोजना या विषयांतर्गत त्यांनी पश्चिम विदर्भातील समस्या मांडली. आ. संजय कुटे म्हणाले की, 2006- 7मध्ये कळमखेड गावात किडनीसंबंधित शेकडो रुग्ण अचानकच आढळले. लगान गावात अचानक हा आजार कसा वाढला, याची कारणे जाणली तेव्हा खारपाण पट्टा असल्याचे स्पष्ट झाले. हा पट्टा शेकडो वर्षांपूर्वीचा. भूस्तर रचनेमुळे असे घडते. बुलडाणा, अकोला अमरावती हे तीन जिल्हे मुख्यत्वे खारपाण पट्ट्यात येतात. जगात हा वेगळा प्रकारचा भूभाग आहे. एकीकडे सातपुडा पर्वत आहे. पूर्णा नदीचा उगम होतो तेथून हा पट्टा चालू होतो. बुलडाणापर्यंत. जळगाव खांदेशपर्यंत आहे. पूर्वेला सातपुडा, उत्तरेकडे प्रभाव वाढतो. दक्षिण भागात कमी आहे. सातपुडा पर्वतावरून तेथून दगड, गाळ वाहून येतो. हा गाळाचा प्रदेश निर्माण झाला पूर्णा नदीच्या दोन्ही बाजूला, दक्षिण बाजूला कमी, उत्तरेला जास्त. अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव, अकोट, तेल्हारा, संग्रामपूर, जळगाव जामोद हे पूर्णतः खारपाण पट्टाबाधित क्षेत्र आहे. 16 तालुके अंशतः बाधित आहेत.कळमखेड गावात किडनीसंबंधित शेकडो रुग्णांच्या रक्तात कॅडमिअम, लीड, मर्क्युरी आढळले. पोटाचे विकार आढळले. पिण्याच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात क्षार असल्याचे आढळले. टीडीएस प्रमाणापेक्षा जास्त आढळले. तलाव वगैरे सिंचनाच्या सोयी नसल्याने जमिनीतून अनिर्बंध पाणी उपसामुळे गोडे पाणी संपून क्षारयुक्त पाण्याचा स्तर असल्याचे स्पष्ट झाले. संपूर्ण झोन डार्क झोनमध्ये गेला. 500 मृत्यू केवळ जळगाव व संग्रामपूर तालुक्यात झाले होते.जनावरांचेही हाल होते. शेतीचा पोत कमी झाला. उत्पादन क्षमता कमी झाली. तातडीचा उपाय म्हणून आरओ प्लांट बसवले. जल पुनर्भरण सुरू केले. नंतर देवेेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवाराची कामे सुरू केली. जमिनीत पाणी मुरवणे सुरू झाले. क्षार कमी होण्यास सुरू झाले. स्काडा योजना सुरू केली.