‘शालार्थ आयडी’ घोटाळा चौकशी समितीच्या अध्यक्षालाच अटक

शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

नागपूर / 22 मे: सध्या राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याच्या चौकशी समितीचे अध्यक्ष राहिलेले विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांना गुरुवारी रात्री अटक केली. विशेष म्हणजे, शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासासाठी सुरुवातीला चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यांच्या अहवालाच्या आधारेच या संपूर्ण चौकशीला नवीन वळण मिळाले. आता स्वत: वंजारीच चौकशीच्या फेर्‍यात सापडले आहेत.
नागपूर जिल्ह्यात 2019 पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वेतन अदा करण्यात आले. नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी 12 मार्च रोजी पोलिसांकडे या घोटाळ्याची तक्रार केली. उल्हास नरड यांच्या सांगण्यावरून ही तक्रार करण्यात आली होती. प्राथमिक माहिती अहवालानुसार, विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने फेब्रुवारी 2025 मध्ये शिक्षण आयुक्तांना अहवाल सादर केला होता. उपसंचालक कार्यालयाने 211 प्राथमिक शिक्षक, 2 मुख्याध्यापक, 18 कनिष्ठ लिपिक, 13 शिपाई अशी 244 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची यादी दिली होती. त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी वंजारी यांच्या अहवालाच्या आधारे कठोर भूमिका घेत तपासणी सुरू केली.
यासाठी 2019 ते 2025 पर्यंत नागपूर जिल्ह्यातील संशयित प्राथमिक शाळांमधील ‘शालार्थ आयडी’चा तपास सुरू केला होता. परंतु, आता वंजारी यांनाच अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वंजारी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होण्यापूर्वी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी होते. या दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी असलेले मृत सोमेश्वर नैताम यांची खोटी स्वाक्षरी करून 2010 ते 2014 या काळात शिक्षक रुजू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच, त्यांचे ‘शालार्थ आयडी’ 2019 ते 2025 या काळात निर्माण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे वंजारी यांना अटक करण्यात आली असून या दिशेने तपास केला जाणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button