जरांगेंच्या आंदोलनाला रसद पुरवणार्यांची नावे उघड करणार
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याची ग्वाही

*ना.पंकज भोयर यांचा इशारा
नागपूर /31 ऑगस्ट : गणेशोत्सवाच्या गर्दीत मुंबईत मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राजकीय अजेंडा राबवला जातोय का, अशी शंका आहे. जरांगेंच्या आंदोलनाला रसद पुरवणारे कोण आहेत, याची यादी आमच्याकडे आहे. योग्यवेळी त्यांची नावे उघड केली जातील, असा इशारा गृह (ग्रामीण ) राज्यमंत्री पंकज भोयर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला. मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता आहे. त्याचा परिणाम म्हणून नागपुरात ओबीसी महासंघाकडून साखळी उपोषण करण्यात सुरू आहे. परंतु जरांगे यांच्या आंदोलनामुळे ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही. अशी ग्वाही पंकज भोयर यांनी दिली.मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली आहे. हैद्राबाद गॅझेटमध्ये कुणबी नोंदी असणार्या मराठ्यांना ओबीसी दाखले दिल्या गेले. परंतु असे दाखले सरसकट मराठा समाजाला देता येणार नाही. सगेसोयर्यांनाही असे दाखले देता येणार नाही. मराठा आरक्षणाची मागणी आजचीच नाही. असे असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट का केले जात आहे असा प्रश्न पंकज भोयर यांनी उपस्थित केला.




