मूर्तिजापूर टांग्यांचे शहर आठवणींच्या संग्रहालयात होतेय जमा

वारसा हरवतोय मूर्तिजापूरचा ’टांगा’ काळाच्या गर्तेत : सांस्कृतिक ओळख धोक्यात

* टांगा चौक नावापुरताच; वास्तवात टांगा दिसेनासा

* वाहतुकीच्या क्रांतीने परंपरेवर घातला घाव

मूर्तिजापूर /8 फेब्रुवारी – मूर्तिजापूर शहराची ओळख केवळ रेल्वे जंक्शनपुरती मर्यादित नाही, तर टांग्यांचे शहर म्हणूनही ती सर्वदूर परिचित आहे.कधीकाळी शहराच्या रस्त्यांवरून खणखणीत घंटानाद करत धावणारे टांगे, प्रवाशांची गर्दी आणि घोड्यांच्या टापांचा आवाज. हीच मूर्तिजापूरची खरी ओळख होती. आज मात्र हा वारसा नामशेष होतोय.
शहरातील टांगा चौक आजही त्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतो.जुनी वस्ती ते रेल्वे स्टेशन, बाजारपेठ ते ग्रामीण भाग, सर्वत्र टांग्यांचीच सर्रास वाहतूक होती.प्रवासी,व्यापारी, नोकरदार,विद्यार्थी प्रत्येकाचा प्रवास टांग्यातूनच व्हायचा. ऑटो, किंवा दुचाकींच्या आधी टांगा हेच मूर्तिजापूरचे जीवनवाहन होते.इंग्रजकालीन काळात मूर्तिजापूर रेल्वे जंक्शनला विशेष महत्त्व होते. त्यावेळी स्टेशनवर उतरलेला प्रत्येक प्रवासी टांग्यात बसूनच शहरात येत असे. या टांग्यांवर अवलंबून अनेक कुटुंबांची उपजीविका चालत होती. पिढ्यान्पिढ्या हा व्यवसाय जपणारे घोडेवाले शहराच्या सामाजिक व आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग होते. आज ऑटोरिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहनांनी रस्ते व्यापले आहेत.वेग,सोय आणि तंत्रज्ञानाच्या झगमगाटात टांगा मागे पडत गेला. सध्या शहरात केवळ चार-पाच टांगे उरले असून तेही अस्तित्वासाठी झगडताना दिसतात. प्रवाशांच्या नजरेतून,शहराच्या दैनंदिन व्यवहारातून टांगा जवळपास हद्दपार झाला आहे.एकेकाळी दिवसाला 15-20 फेर्‍या असायच्या, आज दिवसाला दोन चार फेर्‍या मिळते. खर्च वाढला,उत्पन्न संपले असे टांग्यावाले हताशपणे सांगतात.टांगा हा केवळ वाहतुकीचे साधन नव्हते, तर मूर्तिजापूरच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि ओळखीचा भाग होता. आज तो लुप्त होत असताना, शहर एक अमूल्य वारसा गमावत आहे.भविष्यात कदाचित टांगा फक्त छायाचित्रांमध्ये, जुन्या आठवणींमध्ये आणि इतिहासाच्या पुस्तकांतच उरेल,अशी भीती व्यक्त होत आहे.मूर्तिजापूरचा हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी विशेष उपक्रम, पर्यटनाच्या माध्यमातून टांग्यांचे संवर्धन किंवा किमान सांस्कृतिक ओळख म्हणून त्याचे जतन करणे गरजेचे आहे.अन्यथा, टांग्यांचे शहर म्हणून ओळख असलेले मूर्तिजापूर, आपलीच ओळख गमावून बसेल हे निश्चित.

संबंधित बातम्या

Back to top button