महाराष्ट्र डीजे मुक्त करण्यासाठी सोलापूर पॅटर्न राबवा

आ.श्रीकांत भारतीय यांची विधानपरिषदेत लक्षवेधी

नागपूर /14 डिसेंबर : ध्वनी प्रदूषणाचे गंभीर दुष्परिणाम होत असून पर्यावरण विभाग आणि पोलीस प्रशासनामार्फत यावर कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. तथापि, ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी शासनाबरोबरच नागरिकांचा सहभाग आव श्यक अस ल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत सांगि तले. सदस्य श्रीकांत भारतीय यांनी डीजेच्या आवाजावर नियंत्रण आणण्याबाबत नियम 97 अन्वये अल्पकालीन सूचना उपस्थित केली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला. श्रीकांत भारतीय म्हणाले की, राज्यात वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त असून त्याचा थेट परिणाम आरोग्यावरही होत आहे. सोलापूर शहराने ‘डीजे मुक्त शहर’ ही संकल्पना यशस्वीपणे राबवली आहे. तिथे सर्व धार्मिक कार्यक्रम आणि मिरवणुकांतून डीजेचा वापर बंद झाला आहे. लोककला आणि पारंपारिक वाद्यांचा वापर करण्यावर भर असतो. हाच पॅटर्न संपूर्ण राज्यात अंमलात आणून महाराष्ट्र डीजे मुक्त करावा, अशी मागणी श्रीकांत भारतीय यांनी केली. तर याचवेळी अमोल मिटकरी यांनी राज्यात डीजेवर कायमस्वरूपी बंदी आणण्याची मागणी लावून धरली. पंकजा मुंडे म्हणाल्या की, ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने मानके ठरविण्यात आली आहेत. निवासी आणि शांतता क्षेत्रामध्ये रात्रीच्या आवाजावर विशेष बंधने आहेत. याच्या उल्लंघनाबाबत तक्रार प्राप्त होताच पोलीस प्रशासनामार्फत तत्काळ कारवाई करण्यात येते. प्रदूषण रोखण्याबाबत जिल्हा पातळीवर समिती असून या समितीमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल. तथापि, शासन आणि प्रशासनामार्फत केलेल्या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याशिवाय यश येत नसल्याने ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतः नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

संबंधित बातम्या

Back to top button