राहुल गांधींच्या केसाला जर धक्का लावाल तर…
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

* संविधान सत्याग्रह पदयात्रेत जोरदार फटकेबाजी
नागपूर / 29 सप्टेंबर : नागपूर येथील दीक्षाभूमीवरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धव सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली संविधान सत्याग्रह पदयात्रेची सुरुवात झाली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपाच्या एका प्रवक्त्याने छातीत गोळ्या घालण्याची जाहीर धमकी दिली आहे. त्याचा तीव्र शब्दात धिक्कार करत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या छातीत गोळ्या घालणारी औलाद अजून जिवंत असून हा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काळ्या टोपीतून आला आहे; परंतु राहुल गांधींच्या केसाला जर धक्का लावाल तर याद राखा असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आमचे निवेदन जाहिरपणे सांगितलेले आहे. निसर्ग, नियती त्यांना सुबुद्धी देवो ही प्रार्थना करत आहे. दसर्याला रावणाचे दहन केले जाते ते एका व्यक्तीचे नाही तर प्रवृत्तीचे दहन असते. संघाची दहा तोंडे दहा दिशेनेच नाही तर सर्व प्रतिगामित्वामध्ये दडलेली आहेत त्याचा धिक्कार व दहन करावे अशी आमची अपेक्षा आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, संविधानाला अभिप्रेत असलेल्या भारतासाठी हातात हात घालून सर्वभारतीयांनी काम करावे आणि संविधानाचे सत्य सर्वदूर पसारावे हाच या पदयात्रेमागचा हेतू आहे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. यावेळी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी म्हणाले की, लोकशाही व संविधान तसेच लोकांच्या सत्याग्रहाचा अधिकार यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली असून हा जनतेचा आक्रोश आहे. या पदयात्रेत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व सर्वसामान्य जनता सहभागी झालेली आहे. या पदयात्रेने दुपारपर्यंत अशोकवन इथपर्यंतचा प्रवास तिथेच भोजन घेऊन विश्राम केला. आज सायंकाळी यात्रा बुटीबोर येथे पोहोचणार असून तिथे जाहीर सभा व यात्रेचा मुक्काम असणार आहे.




