फडणवीसांना गडचिरोलीच्या खाणी वाटण्यात रस

नागपूर /27 ऑक्टोबर – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली. राहुल गांधी यांच्याच्या ट्विटला पाठिंबा देताना सपकाळ म्हणाले की, फडणवीस हे अत्यंत कुचकामी गृहमंत्री ठरले आहेत. त्यांच्या कार्यकाळात राज्यात महिलांवरील अत्याचार, कोयता गँग, खोक्या संस्कृती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री देणे आवश्यक आहे, कारण सध्या फडणवीस गडचिरोलीच्या खाणी कोणाला वितरित करायच्या आणि देशाचे पंतप्रधान कसे होईल याचा खटाटोप करीत आहेत.

सपकाळ यांनी स्वारगेट प्रकरणाचा उल्लेख करत महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे विधान लाजिरवाणे असल्याचे सांगितले आणि हे फक्त राजकीय बाब नसून महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न असल्याचे अधोरेखित केले. निवडणूक आयोगावरही त्यांनी निशाणा साधला आणि राहुल गांधींनी मतचोरीच्या विरोधात देशभरात मोहिम सुरू केल्याचे सांगितले, ‘गली गली में चोर है, चुनाव आयोग चोर है’ ही जनतेची भावना आहे, असे त्यांनी नमूद केले.

जैन बोर्डिंग प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांच्यावर कारवाईची मागणी करत सपकाळ म्हणाले की, साडेतीन एकर जमीन गिळंकृत केलेल्या मोहोळांचा राजीनामा होणे आवश्यक आहे; व्यवहार रद्द करून चालणार नाही, दोषींवर कारवाई आवश्यक आहे. भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आहे; कोणीही तिथे गेला की स्वच्छ होतो, सत्तेत आल्यानंतर सर्वांनाच क्लिन चिट दिली जाते.

शेतकरी आणि मदत निधीबाबत सपकाळ म्हणाले की, हे सरकार दिवाळखोरीच्या मार्गावर आहे; पंतप्रधान आवास योजना आणि लाडकी बहिण योजना अडकल्या आहेत. मुख्यमंत्री यांनी हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत कोणतीही मर्यादा न ठेवता जाहीर करावी आणि सर्व शेतकर्‍यांचे कर्जमाफी करावी. शेवटी, बाबासाहेब पाटील यांच्या शिक्षक कर्जावरील वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि सत्ताधार्‍यांना आपल्या नातेवाईकांच्या फायद्यासाठी निर्णय घेण्याची सवय असल्याचे स्पष्ट केले. राहुल गांधींच्या भूमिकेला पाठिंबा देत सपकाळ यांनी ठळकपणे सांगितले की, ही केवळ राजकीय टीका नाही, तर महाराष्ट्राच्या सुरक्षिततेचा आणि न्यायाचा लढा आहे.

संबंधित बातम्या

Back to top button