निवडणुका महायुुतीतच पण भाजपचे निर्विवाद वर्चस्व दाखवा!
फडणवीसांचा वर्धेतून दमदार आदेश

-कार्यकर्त्यांना सुसंवादाचा मंत्र
-म्हणाले…भांडण सोडा, नातं जपा
वर्धा / 28 जुलै : राज्याच्या राजकारणात येणार्या दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगणार असून, त्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) तयारीचा बिगुल फुंकला आहे. वर्धा येथे झालेल्या भाजपच्या महामंथन मेळाव्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना थेट आदेश दिला. आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुतीमध्येच लढायच्या आहेत, पण या निवडणुकांमध्ये भाजपचे निर्विवाद वर्चस्व स्पष्टपणे दाखवायचे आहे! त्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, आपण जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत ते महापालिकांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत. परंतु जिथे महायुती शक्य नाही, तिथे आपल्याला मित्रपक्षांवर एकही वाईट शब्द उच्चारायचा नाही. लढत मैत्रीपूर्ण हवी! मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या जुन्या भूमिकेची आठवण करून देत टोला लगावला. ते म्हणाले, 2017 मध्ये सत्तेत असूनही शिवसेनेने आमच्यावरच रोज टीका केली. आपण तो मार्ग स्वीकारायचा नाही. हे युद्ध शत्रूंशी आहे, मित्रांशी नव्हे!
भाजपच्या घरातील छोट्या वादांविषयीही फडणवीसांनी अचूक निरीक्षण व्यक्त केलं. पक्ष म्हणजे एक कुटुंब आहे. दोन भावांत भांडणं होतातच. पण निवडणुकांच्या तोंडावर आपण एकदिलाने राहिले पाहिजे. छोट्या भांडणांनी मोठे नुकसान होऊ शकते, असा इशारा देतानाच त्यांनी सडेतोड भाषेत सांगितलं की, जो पक्षाला खड्ड्यात घालण्याचं काम करेल, त्याला पक्षच खड्ड्यात घालेल. फडणवीस यांनी स्पष्टपणे दावा केला की, आज राज्यात भाजपसाठी अनुकूल लाट आहे. जनता भाजपला निवडून देण्यासाठी सज्ज आहे. आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यात सक्षम कार्यकर्ते आहेत. गरज आहे ती फक्त एकत्र येण्याची आणि संघटित ताकदीने मैदान गाजवण्याची.
-‘78 हजार बाटल्या रक्तदान-कार्यकर्त्यांची जिद्द!’
भाजप कार्यकर्त्यांच्या क्षमतेचे उदाहरण देताना फडणवीस म्हणाले, पूर्वी शिवसेनेच्या नावावर 25 हजार बाटल्यांचा रक्तदान विक्रम होता. पण आपले कार्यकर्ते एक पाऊल पुढे गेले. 22 जुलैला अध्यक्षांच्या आदेशानंतर भाजपने एका दिवसात तब्बल 78 हजार बाटल्या रक्तदान करून दाखवल्या! मनावर घेतलं तर भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी कोणतही काम अशक्य नाही, हेच यातून दिसून आलं आहे.
-प्रेम, प्रेरणा आणि शिस्तीचा संदेश
देवेंद्र फडणवीस यांनी वर्धेतील भाषणातून भाजप कार्यकर्त्यांना एकाच वेळी प्रेम, प्रेरणा आणि शिस्तीचा संदेश दिला. एकीकडे महायुतीतील समन्वयाची जपणूक, तर दुसरीकडे भाजपच्या शक्तीचे ठसठशीत दर्शन, हे या भाषणाचे मूळ सूत्र होते. आता निवडणुकांची रणधुमाळी अधिकच तीव्र होणार, यात शंका नाही. फडणवीसांच्या आवाजात आज केवळ आदेश नव्हता, तर जनतेचा भरवसा, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि सत्ता टिकवण्याचा अदृश्य निर्धारही दिसून आला.




