खा. डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला भीषण अपघात

थोडक्यात जीवितहानी टळली

-उमरेड फाट्याजवळ घटना
भंडारा / 11 सप्टेंबर : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आटोपून भंडार्‍याकडे परत येत असताना भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या फॉर्च्युनर (एमएच 36 एपी 9911) वाहनाला आज पहाटे भीषण अपघात झाला. नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात खासदार पडोळे किरकोळ जखमी झाले असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, थोडक्यात मोठी जीवितहानी टळली.
दिल्ली येथे उपराष्ट्रपती पदाकरिता मतदान आटोपून खासदार पडोळे विमानाने मुंबईत पोहोचले होते. तेथे आवश्यक कामकाज उरकून स्वतःच्या वाहनाने भंडार्‍याकडे परतत असताना उमरेड फाट्याजवळ अचानक समोरून आलेल्या वाहनामुळे संतुलन बिघडले आणि जबरदस्त धडक बसली. अपघात गंभीर स्वरूपाचा असला तरी खासदार पडोळे यांच्या सोबत प्रवास करणारे सहकारी सुखरूप आहेत. घटनेची माहिती कळताच त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण पसरले होते. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली व वाहन रस्त्याच्या कडेला हलवून पुढील चौकशी सुरू केली आहे. अपघातानंतर डॉ. पडोळे यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. किरकोळ जखमा झाल्या असल्या तरी जीवितहानी टळल्याने सुटकेचा निःश्वास सोडण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button