नगरपालिका, नगरपंचायतची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार
20 डिसेंबरपर्यंत एग्झिट पोलवरही बंदी

* 21 डिसेंबरपर्यंत आरसंहिताही लागू राहणार
* नागपूर न्यायालयाचा निर्णय
नागपूर/2 डिसेंबर – राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. काही नगरपरिषदांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने जवळपास 20 नगरपरिषदांमध्ये मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार होती, पण याचिकेत नमूद केले की सर्व निकाल एकाच दिवशी जाहीर न झाल्यास या नगरपरिषदांच्या निकालावर परिणाम होऊ शकतो.
सर्व युक्तिवाद ऐकून खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल एकाच दिवशी, म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. मतदान आज झाले तरी त्याचे निकाल 21 तारखेला जाहीर होतील. यासोबतच, निवडणूक संपल्यानंतर अर्धा तासात एक्झिट पोल जाहीर करता येतील. तसेच, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी लागू असलेली आदर्श आचारसंहिता 20 डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे. निवडणूक रद्द झालेल्या ठिकाणी उमेदवारांना आधी मिळालेले निवडणूक चिन्ह कायम राहणार आहे. मात्र, या ठिकाणी उमेदवारांनी केलेल्या खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्याची मागणी न्यायालयाने मान्य केलेली नाही. निकाल पुढे ढकलल्यामुळे प्रशा सनावरही मोठे काम वाढले आहे. ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्र 21 डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावे लागणार आहेत. जवळपास 280 मतमोजणी केंद्रांमध्ये ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्तही लागेल. स्ट्राँग रूममध्ये मतदानाची यंत्रणा रोज तपासावी आणि कर्मचार्यांनी स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. विधानसभेच्या तुलनेत नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी जास्त वेळ घेतल्याने प्रशासन आणि पोलिस यंत्रणेला सुमारे तीन आठवडे सतत काम करावे लागणार आहे.




