कोट्यवधींची बिले थकल्याने कंत्राटदाराची आत्महत्या

पीडब्ल्यूडीकडे 30 ते 40 कोटींचे देयक प्रलंबित

-नागपूरातील खळबळजनक घटना
नागपूर / 1 सप्टेंबर : शहरात सोमवारी (दि. 1 सप्टेंबर) एका कंत्राटदाराने कामांची कोट्यवधींची बिले थकल्याने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काटोल रोडवरील राज नगर भागातील फ्लॅटमध्ये मुन्ना वर्मा (वय अंदाजे 45) यांनी जीवन संपवले. या घटनेमुळे नागपूरच्या कंत्राटदारांमध्ये संताप आणि शोककळा पसरली आहे.
मुन्ना वर्मा ‘श्री साई असोसिएट्स’ या नावाने बांधकाम कंत्राट व्यवसाय करीत होते. त्यांचे दोन हॉटमिक्स प्लांटही आहेत. त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विविध कामांत सहभाग घेतला होता. मात्र, त्यांची तब्बल 30 ते 40 कोटी रुपयांची बिले प्रलंबित असल्याचे समजते. देयकाची वसुली न झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून ते प्रचंड तणावात होते. अलीकडेच नागपूरमध्ये कंत्राटदारांनी थकीत बिलांसाठी आंदोलन छेडले होते. वर्मा यांनीही यात सक्रिय सहभाग घेतला होता. मात्र, खात्याकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने त्यांच्या नैराश्यात भर पडली.
सोमवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी त्यांनी गळफास घेतल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीय व शेजार्‍यांनी पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या घटनेनंतर नागपूरमधील कंत्राटदारांमध्ये संताप उसळला असून, सरकार आणि पीडब्ल्यूडी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रलंबित देयकांच्या थकबाकीमुळे अनेक कंत्राटदार अडचणीत असल्याचा आरोप त्यांच्या सहकार्‍यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button