अकोटच्या कालका माता मंदिर चोरीचा लावला छडा; एक आरोपी अटक

गुन्हे शाखेने आरोपीला अमरावतीतून ठोकल्या बेड्या

गुन्हेगारांकडून साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोला / 11 मार्च : अकोट शहरातील श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध कालका माता मंदिरात झालेल्या धाडसी चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. तांत्रिक तपासाचे चक्र फिरवत पोलिसांनी अमोल काशीराम तेलगोटे या सराईत चोराला अमरावती जवळून ताब्यात घेतले. आरोपीकडून 7 लाख 21 हजार 68 रुपयांचे दागिने आणि चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले असून, या कारवाईमुळे अकोट शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 22 फेब्रुवारी रोजी मंदिर परिसरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास झाली होती. चंद्रशेखर भीमराव गावंडे यांनी याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेलके यांच्याकडे सोपवली होती. आरोपी अमोल हा मूळचा बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथील रहिवासी असून तो अत्यंत शातिर आहे. चोरी करताना तो मोबाईल बंद ठेवायचा आणि विना क्रमांकाची दुचाकी वापरायचा. विशेष म्हणजे, चोरी केलेले दागिने ओळखू येऊ नयेत म्हणून त्याने घरातच दागिने वितळवण्याची भट्टी आणि कटर यंत्र बसवले होते. पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करण्यासाठी सुमारे 150 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे चित्रण तपासले. आरोपी छत्तीसगडमधील रायपूरला पळून गेल्याचे समजताच पथकाने तिथे धाव घेतली, मात्र तो तिथून पुन्हा अकोल्याकडे निघाल्याचे समजले. अखेर 1200 किलोमीटरचा थरारक पाठलाग करून अमरावतीजवळ त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्याकडून 1.66 लाखांची सोन्याची अंगठी, सोन्याची लगड, चांदीचे बिस्किट आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत पीआय शंकर शेलके आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने मोलाची कामगिरी बजावली.

संबंधित बातम्या

Back to top button