11 वर्षीय बालकाचे अपहरण करून खून
नागपूर जिल्ह्यातील थरारक घटना

-मृतदेह पोत्यात भरून झुडपात टाकला
नागपूर / 18 सप्टेंबर : नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चनकापूर परिसरात सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना उघडकीस आली. खंडणीसाठी अकरा वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची निर्दयपणे हत्या करण्यात आली. मृतदेह पोत्यात भरून झुडपात टाकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सूत्रधारासह तिघांना अटक केली आहे. हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव जित युगराज सोनेकर (वय 11, रा. वॉर्ड क्रमांक 2, खापरखेडा) असे आहे.
अटक केलेले आरोपी राहुल गौरीलाल पाल (वय 25), अरुण भारती (वय 25) आणि यश गिरीश वर्मा (वय 21, सर्व रा. चनकापूर कॉलनी, खापरखेडा) आहेत. मुलगा जित याचे वडील युगराज सोनेकर यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. अलीकडेच त्यांनी शेती विकून कोट्यवधी रुपये मिळविल्याची कुजबुज आरोपींना समजली होती. या माहितीच्या आधारावरच आरोपी राहुल पाल याने आपले साथीदार अरुण भारती आणि यश वर्मा यांच्यासह मुलाचे अपहरण करून पाच लाख रुपये खंडणी मागण्याची योजना आखली.
मात्र, जित आधीपासूनच शेजार्यांना ओळखत असल्याने त्यांचा पर्दाफाश होईल, अशी भीती आरोपींना वाटली. परिणामी खंडणी मागण्याआधीच या तिघांनी त्याचा खून करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी शाळा संपल्यानंतर जित घरी जात असताना आरोपींनी कार थांबवून घरी सोडतो असे सांगून त्याला गाडीत बसवले. कारमधून फिरवत त्यांनी त्याला कोराडी, वारेगाव आणि मानेगाव परिसरात नेले. अखेर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पारशिवनी पुलाजवळ त्याचा गळा दाबून निर्दय खून करण्यात आला. नंतर मृतदेह एका पोत्यात भरून राहुलच्या घरामागील पडक्या इमारतीत लपवण्यात आला.
दोन दिवसांनी मृतदेहातून दुर्गंधी सुटू लागल्याने भीतीपोटी आरोपींनी बुधवारी पुन्हा तो पोता घेऊन चनकापूरजवळच्या निर्जन झुडपात फेकून दिला. याच ठिकाणी एक श्वानप्रेमी फेरफटका मारत असताना त्याच्या कुत्र्याने सतत एका झुडपाकडे भुंकणे सुरू केले. त्याने जवळ जाऊन पाहिले असता आत पोत्यात मृतदेह असल्याचे दिसले. यानंतर पोलिसांना माहिती देताच खळबळजनक प्रकरणाचा उलगडा झाला. खापरखेडा पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे केवळ काही तासांतच आरोपी तिघांना अटक करण्यास यश आले. बालकाच्या हत्येने खापरखेडा परिसरासह संपूर्ण नागपूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. खंडणीसाठी जीव घेण्याच्या या घटनेने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.




