प्रत्येक तालुक्यातील 10 गावे स्मार्ट व इंटेलिजेंट करणार!
मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

-नागपूर जिल्ह्यातील सातनवरीला बहुमान
-देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजेंट गाव
नागपूर / 24 ऑगस्ट : आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास ग्रामीण भागाचे रूपडे बदलू शकते, हे सातनवरी गावाने दाखवून दिले आहे. उपक्रमशीलतेच्या जोरावर नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजेंट गाव झाले असून, याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक तालुक्यात किमान 10 गावे स्मार्ट करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 3 हजार 500 गावे स्मार्ट व इंटेलिजेंट करण्याची योजना आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी रविवारी दिली. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पाऊल टाकताना ग्रामीण भागातील शेती, आरोग्य, शिक्षण व प्रशासन या सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान आधारित सुविधा देणे ही काळाची गरज आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. केंद्रीय दूरसंचार मंत्रालयांतर्गत व्हॉईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायजेस आणि 24 देशांतर्गत कंपन्यांच्या सहयोगातून सातनवरीत स्मार्ट ग्राम मॉडेल उभारण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ई-गव्हर्नन्स, आरोग्य व डिजिटल हेल्थ सुविधा, डिजिटल लाईब्ररी, शैक्षणिक ई-लर्निंग व्यवस्था, सौरऊर्जेवर चालणारे प्रकल्प याचा लाभ गावकर्यांना दिला जात आहे.
याच कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंह ठाकूर, सरपंच वैषाली चौधरी तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया आदी प्रकल्पांना ग्रामीण स्तरावर पोहोचवणे हे महत्त्वाचे आहे. नागपूर जिल्ह्याने हा मान पटकावला, याचा आम्हाला अभिमान आहे, असे भावना व्यक्त करत महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, जिल्हा नियोजन समितीतून 1200 कोटी रुपयांचा निधी नागपूरच्या विकासासाठी मंजूर करण्यात आला आहे.
-स्मार्ट व इंटेलिजेंट गाव म्हणजे काय?
ग्रामपंचायत कार्यालयात ई-गव्हर्नन्स सुविधा, गावकर्यांसाठी डिजिटल हेल्थ रेकॉर्ड्स व ऑनलाइन सल्ला, मुलांसाठी ई-लर्निंग, डिजिटल लायब्ररी, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सौर ऊर्जा वापरून वीजेची बचत, इंटरनेट कनेक्टिव्हिटी व डिजिटलीकरण अशा सुविधा उपलब्ध असलेल्या गावांची तुलना स्मार्ट व इंटेलिजेंट गावात होते. ग्रामीण भागाला स्मार्ट व इंटेलिजेंट करण्याचा हा निर्णय महाराष्ट्रासाठी एक संपूर्ण विकासदृष्टी असलेला टप्पा ठरणार असल्याचा विश्वास जनतेमध्ये व्यक्त होत आहे.




