केंद्रीय समिती सदस्यासह 10 नक्षलवादी ठार

नक्षलविरोधी कारवाईत मोठा विजय

-एक कोटींची बक्षिसी असलेल्या बालन्नाचा खात्मा
-जंगलात तब्बल आठ तास भीषण चकमक
गडचिरोली / 11 सप्टेंबर : छत्तीसगडमधील गारियाबंद जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलाने राबवलेल्या नक्षलविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले. गारियाबंदच्या दाट जंगलात झालेल्या रक्तरंजित चकमकीत तब्बल 10 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यात एक कोटी रुपयांची बक्षिसी असलेल्या केंद्रीय समिती सदस्य मोडेम बालकृष्णा ऊर्फ बालन्ना ऊर्फ मनोज (61) आणि ओडिशा राज्य समिती सदस्य प्रमोद ऊर्फ पांडू या दुर्दम्य नक्षल नेत्यांचा समावेश असल्याचे पोलीस सूत्रांनी पुष्टी केली आहे.
सकाळी सुरू झालेली ही चकमक तब्बल आठ तास चालली. सुरक्षा दल जंगलात शोधमोहीम राबवत असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. मात्र, सुरक्षा जवानांनीही प्रत्युत्तरात जोरदार फायरिंग करत नक्षलवाद्यांना कोंडीत पकडले. अखेरीस 10 नक्षलवादी ठार पडले. काही जण जंगलात पसार झाले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात असून सध्या परिसरात मोठी शोधमोहीम सुरू आहे.
मोडेम बालकृष्णा ऊर्फ बालन्ना ऊर्फ मनोज हा मूळचा तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील माडीकोंडा, घानपूर गावचा रहिवासी होता. वयाच्या केवळ विशीतच तो नक्षलवादी चळवळीत दाखल झाला. संघटनेतील महत्त्वाच्या पदांवर तो कार्यरत राहिला. बीजीएन डीव्हीसी सचिव, ओडिशा स्टेट इंचार्ज, सेंट्रल रिजनल ब्युरो मेंबर अशा पदांवर काम केल्यानंतर त्याची केंद्रीय समिती सदस्य म्हणून निवड झाली. छत्तीसगड आणि महाराष्ट्रात त्याच्या नेतृत्वाखाली अनेक हिंसक कारवाया घडल्या होत्या. त्याच्यावर शासनाने तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
-शस्त्रसाठा व कागदपत्रे जप्त
रायपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अमरेश मिश्रा यांनी या कारवाईची माहिती देताना सांगितले की, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, साहित्य आणि महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सुरक्षा दलाने जंगलात टाकलेला फास टाळता न आल्याने नक्षलवाद्यांचा मोठा बळी गेला आहे. अद्याप शोधमोहीम सुरू असून पुढील कारवाया आणखी तीव्र करण्याचे संकेत त्यांनी दिले.
-नक्षलवाद्यांना मोठा धक्का
नक्षलवादी चळवळीतील दुर्दम्य व कडवे नेते ठार झाल्याने या चकमकीनंतर संघटनेला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय समिती सदस्य मनोज याचा खात्मा हा सुरक्षा दलासाठी मोठा विजय मानला जात असून, छत्तीसगड आणि शेजारील महाराष्ट्रातील नक्षलविरोधी मोहिमेला यामुळे गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नक्षलविरोधी कारवायांचा हा यशस्वी टप्पा केवळ सुरक्षा दलाच्या धैर्याचा पुरावा नसून नक्षलवाद्यांच्या कणा मोडण्यास निर्णायक ठरू शकतो.

संबंधित बातम्या

Back to top button